IND vs ENG 3rd ODI Updates in Marathi: रोहित शर्मानंतर भारताचा रनमशीन विराट कोहलीला देखील सूर गवसला आहे. भारत इंग्लंड तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आहे. भारताने पहिले दोन्ही वनडे सामने जिंकत मालिका आपल्या नावे केली आहे. तर दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने आपला फॉर्म परत मिळवत झंझावाती शतक झळकावले होते. यासह चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताचं एक टेन्शन कमी झालं पण विराटचा फॉर्म ही चिंता होती. पण आता ही चिंता पण मिटली आहे.
भारत वि इंग्लंड तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मा १ धाव करून बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि शुबमन गिलने भारताचा डाव सावरत १०० धावांचा आकडा गाठून दिला. यादरम्यान विराट कोहलीने ५० चेंडूत आपले ७३ वे वनडे अर्धशतक झळकावले.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराटने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. विराटने ५५ चेंडूत ५२ धावांची खेळी खेळली. विराटसाठी ५२ धावा हा मोठा आकडा नाही पण विराटला त्याचा सूर पुन्हा गवसला आहे, ही भारतासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. विराट कोहलीने ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले आणि या खेळाडूने ४५१ दिवसांनंतर एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावले आहे.
विराट कोहलीसाठी आदिल रशीद हा मोठा डोकेदुखी ठरणारा गोलंदाज आहे. आदिल रशीदच्या गोलंदाजीवरच विराट कोहली झेलबाद झाला. आदिलने टाकलेल्या चेंडूने विराटच्या बॅटची कड घेत थेट यष्टीरक्षकाच्या हातात गेला आणि विराटच्या या कमबॅक खेळीला पूर्णविराम लागला. आदिल रशीदने विराटला वनडे क्रिकेटमध्ये ५ वेळा बाद केलं आहे. तर तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून ११ वेळा बाद केलं आहे. ही विराटसाठी नक्कीच चिंतेची बाब आहे.
Virat Kohli's cover drive footage from stands ?? pic.twitter.com/uXfuigqjiy
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) February 12, 2025
विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत पन्नासहून अधिक धावांची शेवटची इनिंग खेळली, त्यानंतर पुढील दहा डावात तो पन्नास धावांचा टप्पाही गाठू शकला नाही. पण अहमदाबादमध्ये त्याची बॅट तळपली आणि त्याने आपला फॉर्म परत मिळवला. विराटच्या बॅटमधून कमालीचे कव्हर ड्राईव्हही पाहायला मिळाले. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताचे दोन मोठे खेळाडू असलेले रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा आपल्या फॉर्मात परतले असून भारतासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे.