नवे नायक!
काही वर्षांपूर्वी विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ हे कसोटी क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवू शकतील, असे म्हटले असते तर कुणाचाही विश्वास बसला नसता. सध्याचे वेगवान क्रिकेट ज्ञात असलेले हे दोन कर्णधार बोर्डर-गावस्कर चषक मालिकेत ‘नवे नायक’ म्हणून उदयाला आले. महेंद्रसिंग धोनीने अचानक निवृत्ती पत्करल्यामुळे कोहलीकडे तर मायकेल क्लार्कच्या निवृत्तीमुळे स्मिथकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. पण या दोघांनीही आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवत फलंदाजीच्या तेजाने मालिकेवर छाप पाडली.

साधारण अडीच वर्षांपूर्वीची गोष्ट. भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर देशात आयपीएलचा मोसम बहरला आणि तो संपताच जून महिन्यात भारतीय संघ कॅरेबियन दौऱ्यावर गेला. सचिन तेंडुलकरने विश्रांती घेणे पसंत केले होते, तर गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी दुखापतींमुळे माघार घेतली होती. त्या संघात विराट कोहलीसह तीन खेळाडूंच्या माथी कसोटी क्रिकेटचा टिळा लागला नव्हता. भारताने ती मालिका १-० अशी जिंकली. परंतु क्रिकेटच्या या प्रकारात कोहली मात्र झगडताना आढळला. विशेषत: आखूड टप्प्याचे चेंडू खेळताना त्याची त्रेधातिरपीट उडायची. तीन कसोटी सामन्यांच्या पाच डावांत जेमतेम ७६ धावांची कमाई केल्यामुळे त्याचे पदार्पण फारसे समाधानकारक झाले नव्हते. यापैकी तीन डावांमध्ये विंडीजचा वेगवान गोलंदाज फिडेल एडवर्ड्सचा तो बळी ठरला होता. परंतु त्या अपयशाने खचून गेला असता, तर तो आजचा दिवस पाहू शकला नसता. आता तो कसोटी क्रिकेटमध्ये स्थिरस्थावर झाला आहे; इतकेच नव्हे तर नेतृत्वाची धुरासुद्धा सांभाळत आहे आणि आपल्या पहिल्याच अग्निपरीक्षेत म्हणजे सिडनी कसोटी अनिर्णीत राखण्यात तो यशस्वी ठरला आहे. आतापर्यंतच्या ३३ कसोटी सामन्यांत त्याच्या खात्यावर ४६.३०च्या सरासरीने २५४७ धावा जमा आहेत. यात १० शतके आणि १० अर्धशतकांचाही समावेश आहे.
विंडीज दौऱ्यानंतर भारतीय संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी २०११मध्ये इंग्लंडला गेला. सुरुवातीला कोहलीला संघात स्थान देण्यात आले नव्हते, परंतु युवराज सिंगला दुखापत झाली आणि कोहलीला इंग्लंड दौऱ्यावर पाठवण्यात आले. पण त्याला मालिकेत खेळण्याची संधी मात्र मिळाली नाही. मग वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आला असताना सुरेश रैनाला डावलून कोहलीला संघात स्थान देण्यात आले. परंतु कोहलीला अखेरच्या दोन कसोटी सामन्यांतच खेळायची संधी मिळाली आणि दोन अर्धशतके झळकावत त्याने तिचे सोने केले.
मग डिसेंबर २०११मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी कोहलीची निवड झाली. परंतु त्याचे संघातील स्थान मात्र अनिश्चित होते. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरील दुसऱ्या कसोटीत प्रेक्षकांचा अपमान केल्याप्रकरणी त्याच्या मानधनाच्या अध्र्या रकमेचा दंड त्याला ठोठावण्यात आला. मग पर्थच्या तिसऱ्या कसोटीत त्याने अनुक्रमे ४४ आणि ७५ धावा काढल्या. अ‍ॅडलेडची चौथी आणि अखेरची कसोटी कोहलीसाठी संस्मरणीय ठरली. कारण त्याने कसोटी कारकीर्दीतील पहिलेवहिले शतक साकारले. या संपूर्ण मालिकेत भारताकडून हे एकमेव शतक नोंदवले गेले होते आणि कोहलीच्या खात्यावर सर्वाधिक धावा होत्या. मग न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्धच्या मायदेशातील आणि परदेशांतील मालिकांमध्ये कोहलीने आपली छाप पाडली.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेतील पहिल्याच कसोटीत धोनी दुखापतग्रस्त झाल्यामुळे कर्णधारपद आपसूकच कोहलीकडे चालून आले. त्याने अ‍ॅडलेडच्या आपल्या आवडत्या मैदानावर दोन्ही डावांत शतके झळकावत आक्रमक नेतृत्वाची झलक दाखवली. भारताने ऑस्ट्रेलियाला तोडीस तोड प्रत्युत्तर दिले. परंतु दुर्दैवाने तळाची फळी कोसळली आणि ४८ धावांनी भारताला पराभव पत्करावा लागला. मग ब्रिस्बेन कसोटीत कोहली अपयशी ठरला, परंतु या कसोटीच्या दुसऱ्या डावात शिखर धवनने डावाला सुरुवात करण्यास नकार दिल्यामुळे कोहलीला मैदानावर उतरावे लागले होते. त्याआधी ड्रेसिंग रूममध्ये धवन आणि कोहली यांच्यात वाद झाल्याचेही चर्चेत होते. मेलबर्नच्या तिसऱ्या कसोटीत पुन्हा कोहलीने अनुक्रमे १६९ आणि ५४ धावांची खेळी साकारली. ही कसोटी भारताने अनिर्णीत राखली, पण मालिकेवर मात्र ऑस्ट्रेलियाने कब्जा केला. धोनीने आपल्या कर्णधारपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे पेच निर्माण झाला. परंतु गेले काही वष्रे कोहलीकडे भारताचा भावी कर्णधार म्हणून पाहिले जात होते. त्यामुळे आक्रमक सेनापती होण्याचे गुण असलेल्या कोहलीचा सिडनीच्या अखेरच्या कसोटीसाठी राज्याभिषेक करण्यात आला.
धोनीने २००९मध्ये भारतीय कसोटी संघाला अव्वल स्थान मिळवून दिले होते, परंतु २०११पासून या यशाला उतरती कळा लागली. मायदेशातील मालिकेत फिरकीच्या बळावर मिळवलेले काही विजय सोडले तर, परदेशात भारतीय संघाला मोठे अपयश पदरी पडत होते. या प्रत्येक अपयशाच्या वेळी धोनीने कसोटी कर्णधारपद सोडावे, असा प्रसारमाध्यमे आणि माजी क्रिकेटपटूंनी पिच्छा पुरवला होता. अखेर धोनीने काळाची पावले ओळखत कसोटी क्रिकेटला अलविदा केला.
सिडनी कसोटीत कोहलीने आपले सातत्य दाखवताना आणखी एका शतकाची अदाकारी पेश केली आणि ही कसोटी भारताने अनिर्णीत राखली. कोहलीची सुरुवात तर चांगली झाली आहे. या मालिकेत ८६.५०च्या सरासरीने भारताकडून सर्वाधिक ६९२ धावा कोहलीने काढल्या आहेत. गेल्या काही वर्षांत राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर यांनी निवृत्ती पत्करली तर वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरत आहेत. या परिस्थितीत कोहलीने मात्र कसोटी क्रिकेटमध्येसुद्धा आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले आहे. आगामी विश्वचषकानंतर धोनी एकदिवसीय संघातूनही निवृत्ती पत्करण्याची चिन्हे आहेत. कारण अशा प्रकारची घोषणा त्याने आधीच केली होती. हे पाहता कोहलीकडे कसोटीसह एकदिवसीय संघाचेसुद्धा नेतृत्व सोपवले जाऊ शकते.
इंग्लिश दौऱ्यावर कोहली अपयशी ठरल्याचा ठपका अनुष्का शर्मावर ठेवण्यात आला होता. परंतु ऑस्ट्रेलियातील यशस्वी कामगिरीच्या वेळीसुद्धा अनुष्का मैदानावर साक्षीदार होती. शतकानंतर समस्त क्रिकेटरसिकांच्या साक्षीने तिला ‘फ्लाइंग किस’ अदा करण्यासही तो अजिबात विसरत नाही. जपलेल्या प्रेमप्रकरणाप्रमाणेच त्याने ब्रँडिंगमध्ये थेट सचिनलाही मागे टाकल्याची चर्चा आहे. तूर्तास, आक्रमक आणि कणखर मनोवृत्तीचा हा संघनायक भारताला चांगले दिवस दाखवेल, अशी आशा करू या!
 प्रशांत केणी

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
Rohit Sharma Statement on India Defeat in Pink Ball Test Said we didnt play well enough to win the game
IND vs AUS: भारताने पिंक बॉल कसोटी गमावण्यामागचं रोहित शर्माने सांगितलं कारण, कोणाच्या डोक्यावर फोडलं पराभवाचं खापर?
Travis Head Statement on Mohammed Siraj Fight and Send Off Said I Said Well Bowled IND vs AUS 2nd Test
Travis Head on Siraj Fight: “मी म्हणालो चांगला चेंडू होता पण त्याने…”, सिराज आणि हेडमध्ये नेमका कशावरून झाला वाद? ट्रॅव्हिस हेडने सामन्यानंतर सांगितलं
Travis Head Fastest Century in Day Night Test Match IND vs AUS Adelaide Test
Travis Head: ट्रॅव्हिस हेडचे डे-नाईट कसोटीत सर्वात जलद शतक, स्वत:चा रेकॉर्ड मोडत केली मोठी कामगिरी; भारत बॅकफूटवर
IND vs AUS Controversial Umpiring Over R Ashwin LBW Appeal as Mitchell Marsh Given Out KL Rahul DRS b
IND vs AUS: राहुल आऊट अन् मार्श नॉट आऊट, तिसऱ्या पंचांचा पुन्हा एकदा भारताविरूद्ध निर्णय; मैदानात नेमकं काय घडलं?
Story img Loader