बांगलादेशविरुद्ध शनिवारी झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये डावखुऱ्या इशान किशनचा विक्रमी द्विशतकी झंझावात आणि विराट कोहलीने साकालेल्या शतकाच्या बळावर भारताने २२७ धावांनी यजमान संघाचा धुव्वा उडवला. मात्र, भारताने ही मालिका १-२ अशा फरकाने गमावली. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ४०९ अशी धावसंख्या उभारली. किशनने सलामीला येताना १३१ चेंडूंत २४ चौकार व १० षटकारांची आतषबाजी करत २१० धावांची खेळी केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा किशन हा भारताचा चौथा फलंदाज ठरला. किशनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतकाचा (१२६ चेंडू) विक्रम आपल्या नावे केला. त्याला कोहलीची उत्तम साथ लाभली. कोहलीने या सामन्यात कारकिर्दीमधील ७२ वं ऐतिहासिक शतक साजरं केलं. विशेष म्हणजे विराटने षटकार मारुन शतकापर्यंत मजल मारली. मात्र त्याच्याआधी मैदानात आलेल्या आणि द्विशतकाला गवसणी घालणाऱ्या इशान किशनला कोहलीने असं करण्यापासून रोखलं होतं. मात्र यामागील कारणही तितकं खास होतं असा खुलासा खुद्द इशाननेच केला आहे.
कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील जवळपास तीन वर्षांपासूनचा शतकाचा दुष्काळ संपवताना ९१ चेंडूंत ११ चौकार व दोन षटकारांसह ११३ धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी २९० धावांची भागीदारी रचली. इबादत हुसैन गोलंदाजी करत असलेल्या ३९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विराटने अखूड टप्प्याचा चेंडू फाइन लेगवरुन थेट सीमेपार धाडला. विराटच्या पायावर टाकलेला चेंडू त्याने इतक्या अलगद मनगटी फटका खेळत लेग साईडला षटकार लगावला की गोलंदाही क्षणभर हा फटका पाहतच राहिला. या षटकाराबरोबरच विराटने ऑगस्ट २०१९ नंतर प्रथमच एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावलं. हे विराटचं एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमधील ४४ वं तर एकूण ७२ वं शतक ठरलं.
स्वत: षटकार मारुन शतक झळकावणाऱ्या विराटने ९५ धावांवर असताना षटकार मारुन शतक जळकावण्याचा इरादा असलेल्या इशान किशनला असं न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र विराटने इशानच्या काळजीपोटी हा सल्ला दिला होता असं यासंदर्भात इशानने सांगितलेल्या किस्स्यावरुन समजतं. झालं असं की कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने संघात संधी मिळालेल्या इशानने ९५ धावांवर पोहोचल्यानंतर षटकार मारुन शतकं साजरं करण्याचं ठरवलं होतं. त्याने फलंदाजी करताना विराटला ही गोष्ट बोलून दाखवली मात्र विराटने असं न करण्याचा सल्ला त्याला दिला. षटकार मारण्याऐवजी एक धाव घेऊन शतक पूर्ण करं असं विराटने मला सांगितल्याचं, इशानने सामन्यानंतर स्पष्ट केलं.
नक्की पाहा >> …अन् विराट कोहली मैदानातच इशान किशन समोर करु लागला भांगडा; बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातील Video तुफान Viral
“मी विराटभाईबरोबर फलंदाजी करत होतो. त्याने मी कोणत्या गोलंदाजांना लक्ष्य करावं हे सुचवलं आणि त्याचा सल्ला अगदीच बरोबर ठरला,” असं इशान विराटबरोबर खेळण्यासंदर्भातील अनुभवाबद्दल भाष्य करताना म्हणाला. “मी ९५ वर असताना मला षटकार मारुन शतक साजरं करायचं होतं. मात्र त्याने मला हे तुझं पहिलं शतक आहे असं सांगत शांत केलं आणि एक धाव घेऊन शतक पूर्ण करं असं सांगितलं,” असंही इशान किशन मैदानातील चर्चेसंदर्भात म्हणाला.
नक्की वाचा >> “…तर मी त्रिशतक झळकावलं असतं”; बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर द्विशतक झळकावणाऱ्या इशान किशनचं विधान
४१० धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशचा डाव १८२ धावांत आटोपला. भारताकडून शार्दूल ठाकूर (३/३०), अक्षर पटेल (२/२२) आणि उमरान मलिक (२/४३) यांनी भेदक मारा केला.