विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (आरसीबी) पुन्हा एकदा आयपीएलच्या विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. शारजाहच्या मैदानावर रंगलेल्या एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) आरसीबीला ४ गड्यांनी धूळ चारत स्पर्धेबाहेर ढकलले. यामुळे कर्णधार म्हणून आरसीबी चॅम्पियन बनण्याचे विराटचे स्वप्नही भंगले. कप्तानपद सोडले असले तरी बंगळुरुसाठी शेवटपर्यंत खेळणार असल्याची इच्छा विराटने व्यक्त केली. आयपीएलमधील आरसीबीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल चाहत्यांनी विराटला धन्यवाद म्हटले.
कप्तान म्हणून संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देण्याचे विराटचे स्वप्न अपूर्ण राहिले. कोलकाताविरुद्धच्या पराभवानंतरचे हे दु:ख विराटच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागले होते. सामना संपल्यानंतर विराटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात तो इतर खेळाडूंशी संवाद साधत असताना ढसाढसा रडला. यावेळी एबी डिव्हिलियर्सलाही त्याचे अश्रू रोखता आले नाहीत.
हेही वाचा – T20 World Cup : आयपीएल गाजवलेल्या ‘त्या’ तिघांसाठी टीम इंडियाची दारं होणार खुली!
विराट गेल्या १३ वर्षांपासून ही एक ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करत आहे, पण प्रत्येक वेळी त्याला पराभवाला सामोरे जावे लागत आहे. विराटच्या संघाने ३ वेळा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला आहे. पण प्रत्येक वेळी इतर संघाने आरसीबीला पराभूत करून ट्रॉफी मिळवली आहे.
या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये चमकदार करणाऱ्या सुनील नरिनने कोलकाताला विजय मिळवून दिला. नरिनने पहिल्यांचा गोलंदाजीत धमाकेदार कामगिरी केली. त्याने चार ओव्हरमध्ये फक्त २१ धावा देऊन चार विकेट्स घेतल्या. यामुळेच बंगळुरूला २० षटकांत सात गडी गमावून केवळ १३८ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात कोलकाताने हे आव्हान गाठण्यात आपले ६ फलंदाज गमावले, पण शुबमन गिल आणि नरिन यांच्या आक्रमक फटकेबाजीमुळे त्यांना विजय मिळवता आला. या चमकदार कामगिरीसाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारानेही गौरवण्यात आले.