भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचे सध्या सर्वच बाबतीत वाईट काळ सुरू असल्याचे दिसते. गेल्या काही काळापासून विराट कोहली मैदानावर कामगिरी करण्यात सातत्याने अपयशी ठरत आहे. त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीकादेखील सुरू आहे. २२ जुलैपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी त्याचा संघात समावेश झालेला नाही. समोर आलेल्या माहितीनुसार विराट कोहलीने स्वत:च सुट्टी मागितली होती. ही सुट्टी तो आपल्या पत्नी आणि मुलीसह घालवणार आहे. त्यासाठी तो सहकुटुंब पॅरिसलाही रवाना झाला आहे. मात्र, संकटांनी तिथेही त्याची पाठ सोडलेली नाही.
क्रिकेटमधून ब्रेक घेऊन विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासोबत पॅरिसमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेला आहे. मात्र, सध्या पॅरिसमध्ये हवामानात अनपेक्षित भीषण बदल झाल्याचे बघायला मिळत आहे. पॅरिसमध्ये उष्णतेची लाट सुरू असून तापमान ४१ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. त्यामुळे सुट्टी घालवण्यासाठी ही परिस्थिती नक्कीच आदर्श म्हणता येणार नाही. अनुष्काने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हॉटेलमधील खोलीचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने पॅरिसमधील वाढलेल्या तापमानाची माहिती दिली आहे.
दरम्यान, भारतीय संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्यावर विराट कोहलीने खेळावे अशी बीसीसीआयची इच्छा असल्याचे वृत्त आले आहे. आशिया चषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी कोहलीने या मालिकेत खेळावे, अशी बोर्डाची इच्छा आहे. इनसाइड स्पोर्ट्सला बीसीसीआयच्या एका सूत्राने याबाबत माहिती दिली आहे.
येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयसीसी टी २० विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्यापूर्वी विराट कोहलीचे फॉर्ममध्ये येणे आवश्यक आहे. क्रिकेट खेळूनच त्याचा फॉर्म परत येऊ शकतो, त्यामुळे त्याने झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेत खेळावे, असे म्हटले जात आहे.