दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानातील नवीन पॅव्हेलियन स्टँडला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचं नाव देण्यात आलं आहे. गुरुवारी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु मैदानावर, दिल्ली क्रिकेट असोसिएशनतर्फे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानाला, माजी दिवंगत केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचं नाव देण्यात आलं. गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते, अरुण जेटली मैदानाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी भारतीय क्रिकेटसाठी विराट कोहलीने केलेल्या योगदानाबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला.
“एवढ्या मोठ्या प्रमाणावर माझा सत्कार केला जाईल हे मला कधी वाटलं नव्हतं. माझा सर्व परिवार आता इथे उपस्थित आहे, त्यामुळे काय बोलावं हेच मला समजतंच नाहीये”, सत्कार सोहळ्यानंतर आभार मानताना विराट कोहली थोडा भावनिक झाला. या कार्यक्रमाला विराटची पत्नी अनुष्का शर्माही हजर होती. विराटचा मोठ्या व्यासपीठावर होत असलेला सत्कार पाहून अनुष्का आपले आनंदाश्रू थांबवू शकली नाही. ज्या मैदानावर विराटने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली, त्याच मैदानावर आज विराटचा भव्य सत्कार ही सर्वांसाठी मोठी गोष्ट असल्याचं अनुष्काने पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
यावेळी बोलत असताना विराट कोहलीने आपल्या तरुणपणातील आठवणींना उजाळा दिला. “२००१ साली याच मैदानावर भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध सामना खेळत होता. माझे लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी मला दोन तिकीटं दिली होती. मी याच स्टँडवर बसून सामना पाहत होतो, त्यावेळी मी जवागल श्रीनाथ यांची ऑटोग्राफही घेतली होती. त्या प्रसंगानंतर आता याच मैदानावर माझा सत्कार होणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.” विराटने आपल्या भावना व्यक्त केल्या.