Yuvraj Singh On Virat Kohli: युवराज आणि कोहलीची क्रिकेट कारकीर्द २०११ च्या विश्वचषकानंतर वेगवेगळ्या दिशेने पुढे जात होती. कॅन्सरचे निदान झाल्यावर युवराजला उपचारासाठी क्रिकेटमधून दीर्घ विश्रांती घ्यावी लागली. भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी त्याला १७ महिने लागले. त्यानंतर त्याने पाकिस्तान व इंग्लंडविरुद्ध मालिका खेळल्या पण दोन्ही सामन्यांमध्ये त्याची कामगिरी २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या संघात स्थान निश्चित करण्यासाठी पुरेशी नव्हती.
तोपर्यंत कोहलीने खेळाच्या सर्व प्रकारांमध्ये वेगाने प्रगती केली होती. त्याने संघात आपले स्थान पक्के केले होते. विराटने युवराजनंतर क्रिकेटमध्ये पदार्पण केले असले तरी, जेव्हा युवराज आणि कोहली भेटतात तेव्हा ते अगदी बालपणीच्या मित्रांसारखे वागतात. २०२२ मध्ये मोहाली येथे भारत-ऑस्ट्रेलिया T20I दरम्यान त्यांच्या अशाच भेटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
पण अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये चर्चेदरम्यान युवराजने आता आपण कोहलीच्या जास्त संपर्कात नसल्याचा खुलासा केला आहे. युवराज म्हणाला की, “आता माझं कोहलीशी जास्त बोलणं होत नाही, मी स्वतःच त्याला जास्त त्रास द्यायला जात नाही, जेव्हा विराट कोहली आमच्यासाठी चिकू होता तेव्हाची गोष्ट वेगळी होती आणि आता तो विराट कोहली आहे. दोघांमध्ये मोठा फरक आहे.”
युवराज म्हणाला की, कोहलीने भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसची क्रांती घडवून आणली आहे. अर्थात आम्हाला सगळ्यांनाच एक फिट टीम बनायचे होते त्यासाठी सर्व प्रयत्न पण करत होते पण जेव्हा कोहली कर्णधार झाला तेव्हा त्याने एक स्तर वाढवला होता, त्याने एक बेंचमार्क सेट केला होता.”
युवराजने याच पॉडकास्टमध्ये धोनीसोबतच्या त्याच्या नात्याबद्दलही सांगितले होते. युवराज म्हणाला होता की, “आम्ही चांगले मित्र आहोत असे नाही पण त्यांनी टीम इंडियासाठी खेळताना आम्ही नेहमीच एकत्र चांगलं खेळण्याचा प्रयत्न केला आहे.”
हे ही वाचा<< “विराट कोहलीने १०० धावा करणं भारताला त्रासदायक..”, गौतम गंभीरने पुन्हा केलं लक्ष्य, म्हणाला, “श्रेयसलाच उलट..”
दरम्यान, कोहलीने अलीकडेच सचिन तेंडुलकरच्या ४९ वनडे शतकांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली. न्यूझीलंड, पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान विरुद्धच्या मोठ्या उपांत्य फेरीपूर्वी तो नेदरलँड्स विरुद्ध भारताचा शेवटचा विश्वचषक लीग सामन्यात काय कमाल करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.