भारतीय क्रिकेटपटूंची शारीरिक क्षमता वाढावी आणि ते नेमके कोठे कमी पडतात, याचा अभ्यास करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रत्येक खेळाडूची जनुकीय चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे.

खेळाडूंच्या सराव शिबिरात कर्णधार विराट कोहलीच्या आग्रहाखातर ही चाचणी घेण्यास सुरुवात झाली. खेळाडूंच्या स्नायूंची बळकटी, दुखापतीमधून तंदुरुस्त होण्यासाठी लागणारा वेळ आदी माहितीबाबत अशी चाचणी उपयुक्त असल्याचे कोहलीचे मत आहे. संघाचे सरावतज्ज्ञ शंकर बसू यांनी या चाचणीची शिफारस केली होती व त्यानुसार चाचणीचे नियोजन करण्यात आले. या चाचणीच्या आधारे सराव शिबिरात योग्य ते बदल करण्याचेही बसू यांनी ठरवले आहे. प्रत्येक खेळाडूच्या चाचणीकरिता साधारणपणे २५ ते ३० हजार रुपयांचा खर्च येत आहे.

तंदुरुस्तीच्या नव्या परिमाणांच्या आधारे ही चाचणी घेण्यात येत आहे. अशा प्रकारची चाचणी अमेरिकेतील बास्केटबॉल लीगमध्ये पहिल्यांदा घेण्यात आली होती व त्याचा उपयोग तेथील खेळाडूंच्या प्रगतीसाठी झाला होता.

Story img Loader