Virat Kohli and Mohammed Siraj duo trapping Proteas batters : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊनमध्ये सुरू असलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांची शानदार कामगिरी पाहायला मिळाली. मोहम्मद सिराजने १५ धावांत सहा विकेट घेत दमदार प्रदर्शन केले. विराट कोहली हा त्याच्या यशामागे मुख्य दुवा असल्याचे सिराजबद्दल अनेकदा बोलले जाते. विराटच्या नेतृत्वाखाली आरसीबीपासून टीम इंडियापर्यंत मोहम्मद सिराजच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा होत आहे. केपटाऊन कसोटीतही असेच काहीसे पाहायला मिळाले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराटचा गुरुमंत्राने सिराजला मिळवून दिली विकेट –

विराटच्या कर्णधारपदाच्या काळापासून विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांचे ट्यूनिंग उत्कृष्ट आहे. दोघेही आयपीएलमध्ये एका संघासाठी एकत्र खेळतात. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातही हेच पाहायला मिळाले. विकेटच्या मागे स्लिमध्ये उभे असताना विराट कोहलीने सिराजला एक गुरुमंत्र दिला. त्याच्या या गुरुमंत्राने इतकं उत्तम काम केलं की अवघ्या दोन चेंडूंनंतर सिराजला विकेट मिळाली. यासह त्‍याने कसोटी क्रिकेटमध्‍ये तिस-यांदा पाच विकेट घेण्याचा टप्पा पूर्ण केला. आता त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय होतं संपूर्ण प्रकरण?

दक्षिण आफ्रिकेच्या डावाच्या १६व्या षटकात मार्को यान्सन फलंदाजीसाठी क्रिजवर आला, तेव्हा सिराज त्याच्यासमोर गोलंदाजी करत होता. त्याच षटकात सिराजने डेव्हिड बेडिंगहॅमला बाद केले होते. यान्सन स्ट्रायकवर असताना विकेटच्या मागून सिराजला गुरुमंत्र देताना विराट म्हणाला की, त्याने चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवावा, जेणेकरून जान्सेनच्या बॅटची बाहेरची कडा घेऊन चेंडू मागे येईल आणि तो आऊट होईल. सिराजने नेमके तेच केले आणि दोन चेंडूंनंतर त्याने यान्सनला शून्यावर बाद करून आपली पाचवी विकेट घेतली.

हेही वाचा – Virat Kohli : केपटाऊनमध्ये ‘राम सिया राम’ गाणे वाजताच विराटने जोडले हात, किंग कोहलीचा VIDEO होतोय व्हायरल

या डावात सिराजने ९ षटकात १५ धावा देऊन ६ बळी घेतले आणि हा केवळ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच नव्हे, तर त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या ५५ धावांवर गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या सर्व १० विकेट्स भारतीय वेगवान गोलंदाजांनी घेतल्या. सिराज व्यतिरिक्त बुमराहने दोन विकेट घेतल्या, तर मुकेश कुमारने देखील दोन विकेट घेतल्या. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे ९ फलंदाज झेलबाद झाले तर केवळ कर्णधार डीन एल्गर क्लीन बोल्ड झाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli and mohammed siraj duo trapping proteas batters marco jansen video viral in ind vs sa 2nd test match vbm