Rohit Sharma- Virat Kohli Future Plans: साधारणतः एखाद्या संघाचा स्पर्धेत पराभव झाला की विद्यमान गटातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती द्या, त्यांना निवृत्त करा अशा मागण्या होतात. अनेकदा हे खेळाडू स्वतः सुद्धा अशावेळी आपली निवृत्ती जाहीर करतात. पण यंदा टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विश्वविजेत्या ठरलेल्या भारताने विजयानंतर आपले तीन हुकमी एक्के गमावले आहेत. कर्णधार रोहित शर्मा, सध्याच्या घडीचा सर्वात शक्तिशाली फलंदाज विराट कोहली व अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने २०२४ च्या विश्वचषकानंतर टी २० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. टी २० मध्ये विराट- रोहित यापुढे दिसणार नाहीत हे सत्य पचवणं सध्या भारतीय क्रिकेटप्रेमींना कठीण जात आहे, याचबरोबर आता रोहित व विराट पुढे काय करणार हा एक प्रश्न अनेकांच्या मनात पिंगा घालतोय.

टी २० विश्वचषकात भारताच्या विजयावर शिक्कमोर्तब होताच विराट कोहलीने आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती. “हे एक ओपन सिक्रेट आहे”, असं म्हणत कोहलीने यंदाचा वर्ल्डकप आपल्यासाठी शेवटचा होता असं जाहीर केलं. त्यापाठोपाठ तासाभरातच भारतीय चाहत्यांच्या आनंदाला पॉज लागेल अशी घोषणा कर्णधार रोहित शर्माने केली व आपण निवृत्त होत असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं. या दोघांच्या पाठोपाठ जडेजाने सुद्धा सोशल मीडियावर आपली निवृत्ती जाहीर करत चाहत्यांना धक्का दिला.

अर्थात कोहली म्हणाल्याप्रमाणे या तिन्ही घोषणा काही सरप्राईज नव्हत्या. चाहत्यांना सुद्धा याची कल्पना होतीच पण त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचा क्षण एक धक्का ठरला. रोहित शर्मा सध्या ३७ वर्षांचा आहे, कोहलीचे वय ३६ आणि जडेजा त्याच्यापेक्षा फक्त साडेपाच महिने लहान आहे. तिघांनी सुद्धा मागच्या एका दशकात अनेक यशस्वी सामन्यांमध्ये योगदान दिले आहे. टी २० च्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक सामन्यांमध्ये त्यांनी संघाची धुरा सांभाळली होती. आता विश्वविजेतेपद जिंकल्यावर टी २० मध्ये इतरांना संधी देण्याची ही वेळ आहे असेही या तिघांनी म्हटले.

राहिला प्रश्न आता रोहित व विराट पुढे काय करणार? तर, कसोटी (टेस्ट) आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये त्यांचे महत्त्व पाहता राष्ट्रीय संघात योगदान देण्याची संधी त्यांच्याकडे आहे.

पुढील काही महिन्यांनी भारतासमोर दोन कठीण कसोटी मालिकांचे आव्हान असणार आहे. २०२५ च्या फेब्रुवारी- मार्चमध्ये ५० षटकांची चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा असेल. तर बांगलादेशच्याविरुद्ध मायदेशातच भारत पुढील दोन कसोटी सामने खेळणार आहे. यापाठोपाठ, न्यूझीलंडविरुद्ध आणखी तीन कसोटी सामने खेळून नंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. जर त्यांनी उन्हाळ्यात होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत सलग तिसऱ्यांदा प्रवेश केला, तर त्यानंतर इंग्लंडविरुद्ध भारताचे पाच कसोटी सामने होतील, जिथे भारताने २००७ पासून एकही मालिका जिंकलेली नाही.

रोहित शर्मा हा कसोटी सामन्यांमध्ये भारतीय कर्णधार व सलामीवीर अशी दुहेरी जबाबदारी सांभाळू शकतो. मागील वर्षी भारतात झालेल्या विश्वचषकातील पराभवाचा डाग यंदाच्या टी २० विश्वचषकातील विजयामुळे पुसता आला असला तरी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणं हे रोहितसाठी अजूनही स्वप्न आहे. सध्या रोहित तुफानी फॉर्ममध्ये आहे, हीच वेळ साधून तो लवकरात लवकर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्वरूपात आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो, जेणेकरून त्यानंतर त्याला कोहलीप्रमाणेच आपल्या कुटुंबासह अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल.

हे ही वाचा<< विश्लेषण : ट्रॉफींचा दुष्काळ ते ट्वेन्टी-२० जगज्जेतेपद… विराट कोहलीचे योगदान या प्रवासात किती महत्त्वाचे?

दुसरीकडे, कोहली या पिढीतील सर्वात यशस्वी खेळाडू आहे पण तो आता करिअरच्या अशा टप्प्यात आहे की आतापर्यंत केलेले रेकॉर्ड्स हे आता पुन्हा रचता येत नाही आहेत किंवा टीमच्या यशाकडे पाहिल्यास यापूर्वी जितकं कोहलीचं योगदान होतं त्याची टक्केवारी काही प्रमाणात कमी झाली आहे. विश्वचषकात सुद्धा त्याने अंतिम सामन्यात केलेल्या धावा हीच पूर्ण मोहिमेतील सर्वात मोठी खेळी होती. विराट कोहली सध्या येणाऱ्या पिढीतील खेळाडूंना तयार करण्याची जबाबदारी घेऊ शकतो किंबहुना त्याने ती घ्यावी अशी अनेकांची अपेक्षा आहे. कोहलीची शिस्त, त्याचा फिटनेस, खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे गुण त्याने मेंटॉर बनून पुढच्या पिढीतील खेळाडूंमध्ये रुजवायला हवेत. याव्यतिरिक्त वैयक्तिकरित्या तो ओडीआय, टेस्टमधून आपल्या धावांचे रेकॉर्ड्स अजून उच्च स्तरावर नेण्यासाठी खेळू शकतो.