Virat Kohli and Rohit Sharma share their feelings about Test cricket : भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळल्या गेल्या आहेत. टी-२० मालिका अनिर्णित राहिली, तर टीम इंडियाने वनडे मालिका २-१ ने जिंकली. आता दोन्ही संघ कसोटी मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. कसोटी मालिकेत टीम इंडियाची धुरा पुन्हा एकदा रोहित शर्माकडे असणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहेत. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना या दोन्ही खेळाडूंनी कसोटी क्रिकेट फॉरमॅटबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
एकदिवसीय विश्वचषक २०२३ नंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानात परतणार आहेत. दोन्ही खेळाडू पांढऱ्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहेत. या दोन्ही खेळाडूंच्या मैदानात परतण्याची चाहत्यांना बराच वेळ प्रतीक्षा होती. मालिकेपूर्वी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना या दोन्ही खेळाडूंनी कसोटी क्रिकेट फॉरमॅटबद्दल आपले मत व्यक्त केले. कसोटी क्रिकेटमध्ये आम्ही दररोज काहीतरी वेगळे अनुभवतो आणि या कसोटी मालिकेतही आम्ही आमचे सर्वोत्तम प्रदर्शन करू.
रोहित शर्मा कसोटी क्रिकेटबद्दल काय म्हणाला?
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “कसोटी क्रिकेट हा एक खास फॉरमॅट आहे. एक खेळाडू म्हणून तुम्हाला रोज नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागते. कसोटीत चांगली कामगिरी करण्यासाठी तुम्हाला पाच दिवस चांगली मेहनत घ्यावी लागते. एक व्यक्ती, क्रिकेटर आणि खेळाडू म्हणून तुम्ही कोण आहात याची खरी कसोटी म्हणजे कसोटी क्रिकेट आहे.”
विराट कोहली कसोटी क्रिकेटबद्दल काय म्हणाला?
विराट म्हणाला, “कसोटी क्रिकेट हा खेळाचा पाया आहे. कसोटी सामना खेळताना तुमची एक वेगळी बाजू समोर येते. कसोटीत एक वेगळी भावना असते, जी तुम्हाला जाणवते. माझ्यासाठी आणि संघासाठी कसोटीत चांगले खेळणे खूप महत्त्वाचे आणि खास आहे. माझ्यासाठी कसोटी खेळणे हेच सर्वस्व आहे आणि मी माझ्या देशासाठी १०० कसोटी खेळलो आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
हेही वाचा – VIDEO : ‘माझी लढाई फक्त मैदानावर…’, विराट कोहलीबद्दलच्या ‘या’ गोष्टीने गौतम गंभीरने जिंकली चाहत्यांची मनं
२६ डिसेंबरपासून ही मालिका सुरू होणार –
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या दिवशी पहिला कसोटी सामना सुरू होणार आहे. पहिला कसोटी सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जाणार आहे. ही कसोटी मालिका भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर आजपर्यंत एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला प्रथमच दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकून देण्याची विशेष संधी आहे. असे झाल्यास दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणारा रोहित शर्मा पहिला भारतीय कर्णधार ठरेल.