Virat Kohli And Rohit Sharma New Record: आशिया चषक २०२३ च्या सुपर फोर फेरीतील चौथ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध रोहित शर्माने शुबमन गिलसोबत डावाची सुरुवात केली, परंतु या सामन्यात शुबमन गिल काही विशेष करू शकला नाही आणि ११९ धावा करून बाद झाला. यानंतर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने केवळ ३ धावांची इनिंग खेळली. या सामन्यात कोहलीने निःसंशयपणे निराश केले, परंतु त्याच्या छोट्या खेळीमध्ये त्याने रोहित शर्मासह एकदिवसीय क्रिकेटचा नवा विश्वविक्रम रचला.
विराट-रोहित ही सर्वात जलद ५००० धावा करणारी जोडी –
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी एक जोडी म्हणून ५००० धावा पूर्ण केल्या. तसेच त्यांनी एक नवीन विश्वविक्रमही केला. एक जोडी म्हणून कोहली आणि रोहित यांनी एकदिवसीय सामन्यात केवळ ८६ डावात ५००० धावा पूर्ण केल्या आहेत. विराट-रोहित जोडी म्हणून सर्वात वेगवान धावांचा हा आकडा गाठला. या दोघांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९७ डावांमध्ये जोडी म्हणून ५००० धावा पूर्ण करणाऱ्या गार्डन ग्रीनिज आणि डेसमन्स हेन्स यांचा विक्रम मोडला. आता रोहित शर्मा आणि विराट कोहली ग्रीनिज आणि हेन्सच्या पुढे गेले आहेत.
एकदिवसीय सामन्यात जोडी म्हणून सर्वात जलद ५००० धावा करणाऱ्या जोड्या –
८६ डाव – रोहित-कोहली
९७ डाव – ग्रीनिज-हेन्स
१०४ डाव – हेडन-गिलख्रिस्ट
१०४ डाव – संगकारा-दिलशान
११२ डाव – रोहित-धवन
११६ डाव – सचिन-गांगुली
५००० धावांची भागीदारी करणारी कोहली-रोहित ठरली आठवी जोडी –
एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५००० धावांची भागीदारी करणारी विराट कोहली आणि रोहित शर्मा ही ८वी जोडी ठरली आणि त्याच वेळी, दोघेही एकदिवसीय क्रिकेटमध्ये जोडी म्हणून धावा करण्याच्या बाबतीत आठव्या स्थानावर आहेत. ५००० धावा पूर्ण करणारी ही जोडी भारताची तिसरी जोडी ठरली. एकदिवसीय सामन्यात जोडी म्हणून सर्वाधिक धावांची भागीदारी करणाऱ्या फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी जोडी म्हणून ८२२७ धावा केल्या आहेत.
हेही वाचा – IND vs SL: अर्धशतक ठोकताच रोहित शर्माची आणखी एका विक्रमाला गवसणी, ‘हा’ कारनामा करणारा ठरला पहिलाच सलमीवीर
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांची भागीदारी असलेल्या जोड्या –
८२२७ धावा – सचिन-गांगुली
५९९२ धावा – जयवर्धने-संगकारा
५४७५ धावा – दिलशान-संगकारा
५४६२ धावा – अटापट्टू-जयसूर्या
५४०९ धावा – गिलख्रिस्ट-हेडन
५२०६ धावा – ग्रीनिज-हेन्स
५१९३ धावा – रोहित-धवन
५००० धावा – रोहित-कोहली