Virat Kohli Dismissal Video Viral: भारताचा रनमशीन विराट कोहलीसाठी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ फारच खराब राहिली आहे. या मालिकेतील अखेरच्या सामन्यातही विराट कोहली मोठी खेळी खेळू शकला नाही आणि दोन्ही डावात तो स्वस्तात बाद झाला. पण विराट कोहली संंपूर्ण मालिकेत एकाच पद्धतीने बाद होताना दिसला आणि अखेरच्या डावातही तसंच काहीसं झालं. सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात स्वस्तात बाद झाल्यानंतर विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसला आणि त्याने त्याचा राग स्वतःवर काढला.
सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात विराट कोहलीला १२ चेंडूत केवळ ६ धावा करता आल्या. या डावात तो स्कॉट बोलँडचा बळी ठरला. सामन्याच्या पहिल्या डावातही त्याला बोलँडनेच बाद केले होते. विराटला पुन्हा एकदा बाहेर जाणाऱ्या चेंडूवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि तो स्लिपमध्ये स्टीव्ह स्मिथकडून झेलबाद झाला. विराट कोहलीने या सामन्यात फलंदाजीला उतरल्यावर सकारात्मक सुरूवात केली होती. विराटने बाहेर जाणारे चेंडू चांगल्याप्रकारे बचाव केला होता, पण बाहेरचे चेंडू खेळण्याचा मोह त्याला फार वेळ आवरला नाही.
पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावातही असंच काहीसं पाहायला मिळालं होतं. मात्र यावेळी तो विकेट गमावल्यानंतर चांगलाच संतापलेला दिसला. बाद झाल्यानंतर तो स्वतःलाच दोष देताना दिसला आणि त्याने हाताने स्वत:लाच मारलं. कोहलीने बाद झाल्यानंतर आपल्याच पायावर पंच केला, राग आणि निराशा व्यक्त करत विराट कोहली पुन्हा एकदा संघ अडचणीत असताना स्वस्तात बाद झाला. स्कॉट बोलँड विराट कोहलीसाठी कर्दनकाळ ठरला आहे. बोलँडने विराटला सारख्याच पद्धतीने या मालिकेत ८ वेळा बाद केलं आहे.
हेही वाचा – IND vs AUS: ऋषभ पंतने वादळी अर्धशतकासह घडवला इतिहास, ऑस्ट्रेलियात ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची सुरुवात विराट कोहलीसाठी चांगली झाली. पर्थ कसोटीतील दुसऱ्या डावात त्याने शतक झळकावलं. मात्र यानंतर तो सलग ४ सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला. पर्थ कसोटी वगळता एकाही कसोटीत त्याला अर्धशतकही झळकावता आले नाही. या मालिकेत खेळलेल्या ९ डावांपैकी ५ डावांमध्ये त्याला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. या खराब कामगिरीमुळे त्याला ५ सामन्यांच्या मालिकेत २३.७५ च्या सरासरीने केवळ १९० धावा करता आल्या.
भारताने पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात ६ बाद १४१ धावा केल्या आहेत. भारताने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १८१ धावांवर सर्वबाद करत ४ धावांची आघाडी मिळवली होती. जैस्वाल-राहुलच्या जोडीने चांगली सुरूवात करून दिली. पण हे दोघेही फार काळ मैदानावर टिकू शकले नाहीत. यानंतर ऋषभ पंतने ६१ धावांची वादळी खेळी करत भारताची धावसंख्या १०० पुढे नेली. यासह भारताकडे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १४५ धावांची आघाडी आहे. तिसऱ्या दिवशी जडेजा आणि वॉशिंग्टन भारताच्या डावाची सुरूवात करतील.