Virat Kohli Angry on Australian Media in Melbourne: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना मेलबर्नमध्ये होणार आहे. या कसोटीसाठी भारतीय संघ गाबाहून मेलबर्नला पोहोचला आहे. पण मेलबर्नमध्ये पोहोचताच विराट कोहलीने वाद केला आहे. विराट कोहली मेलबर्न विमानतळावर एका महिला पत्रकाराशी त्याचा वाद झाला. विराट कोहली विमानतळावर महिला रिपोर्टरशी बराच वेळ वाद घालत राहिला. पण हा नेमका वाद का झाला, जाणून घेऊया.
ऑस्ट्रेलियन मीडिया न्यूज ७ने विराट कोहलीचा एक व्हीडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये विराट कोहली महिला रिपोर्टरशी बोलताना दिसत आहे. खरंतर, ऑस्ट्रेलियन पत्रकारांनी विराट कोहलीच्या कुटुंबाचे फोटो काढले, त्यानंतर दिग्गज खेळाडू संतापला. यानंतर विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन पत्रकारांना सांगितले की, तुम्ही लोक माझ्या परवानगीशिवाय माझ्या कुटुंबाचे फोटो काढू शकत नाही. तर न्यूज७ ने दावा केला आहे की त्याच्या मुलांचे कोणतेही फोटो क्लिक केले गेले नाहीत किंवा त्यांचे व्हिडिओही बनवले गेले नाहीत. माझ्या परवानगीशिवाय तुम्ही माझ्या मुलांचे फोटो, व्हीडिओ क्लिक करू शकत नाही; असंही कोहली या व्हीडिओमध्ये सांगताना दिसत आहे.
विराट कोहलीच्या ऑस्ट्रेलियन पत्रकार आणि फोटो पत्रकारांशी झालेल्या वादाचा मुद्दा संपूर्ण ऑस्ट्रेलियात गाजला आहे. ऑस्ट्रेलियन मीडिया विराट कोहलीवर टीका करत आहे. मात्र, विराट आणि ऑस्ट्रेलियन मीडियाचे संबंध नेहमीच चांगले राहिले नाहीत. त्याच्या पहिल्या दौऱ्यावरही ऑस्ट्रेलियन मीडियाबरोबर वाद झाला होता.
विराट कोहली सध्याच्या घडीला त्याच्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. पर्थ कसोटीत शतक झळकावल्यानंतर इतर दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये विराटची बॅट शांत राहिली आहे. जेव्हा संघाला विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, तेव्हा विराट मैदानावर फार काळ टिकू शकला नाही. त्याने ४ डावांमध्ये फक्त २६ धावा केल्या आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळवला जाणार आहे. गाबा कसोटी अनिर्णित राहिल्याने सध्याच्या घडीला पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. भारताने पर्थ कसोटी जिंकली. ॲडलेडमधील पिंक बॉल कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. ब्रिस्बेन कसोटी अनिर्णित राहिली. आता मेलबर्न कसोटी जिंकत कोणता संघ मालिकेत आघाडी घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.