Virat Kohli asks Gautam Gambhir about on field altercations : भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी, बीसीसीआयने एक ब्लॉकबस्टर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि स्टार क्रिकेटर विराट कोहली बीसीसीआय टीव्हीवर एकमेकांची मुलाखत घेताना दिसले. बीसीसीआयने अद्याप संपूर्ण मुलाखत शेअर केलेली नाही, मात्र त्यातील एक छोटासा भाग शेअर केला आहे आणि हे पाहिल्यानंतरच तुम्हाला समजेल की ही मुलाखत किती मनोरंजक असणार आहे.
विराट कोहली आणि गौतम गंभीरची मुलाखत –
या मुलाखतीत गंभीरने विराट कोहलीच्या २०१४-१५ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा उल्लेख केला आहे, ज्यामध्ये किंग कोहलीने शानदार फलंदाजी केली होती. यावेळी विराट कोहलीने गंभीरला एक प्रश्न विचारला, ज्याचे उत्तर गंभीरनेच त्याला विचारले. गौतम गंभीर म्हणाला, ‘मला आठवतं जेव्हा ऑस्ट्रेलिया मालिका तुझ्यासाठी धमाकेदार होती. तू खूप धावा केल्या होत्या आणि या दौऱ्यात तू वेगळ्या झोनमध्ये होता. नेपियरमध्ये माझ्या बाबतीत असेच काहीसे घडले आणि मी मागे वळून पाहिले तर मी पुन्हा अडीच दिवस फलंदाजी करू शकलो असतो का? मला वाटत नाही की मी ते पुन्हा करू शकलो असतो. कारण त्यानंतर मी कधीही त्या झोनमध्ये गेलो नाही.’
विराट कोहलीने २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चार कसोटी सामन्यांच्या आठ डावात ८६.५० च्या सरासरीने एकूण ६९२ धावा केल्या. २००९ च्या न्यूझीलंड दौऱ्याबद्दल बोलायचे झाले, तर नेपियरमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धोका होता आणि गौतम गंभीरने दुसऱ्या डावात ४३६ चेंडूत १३७ धावा करून भारताला पराभवापासून वाचवले होते.
‘मैदानावर तू माझ्यापेक्षा जास्त भिडला आहेस’ – गौतम गंभीर
यानंतर विराट कोहलीने गौतम गंभीरला विचारले की, जेव्हा तू मैदानावर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंशी भांडायचास किंवा वाद घालायचास तेव्हा त्याने तुझी एकाग्रता भंग पावेल आणि बाद होशील असं वाटायचं का? की हे तुला फलंदाजीसाठी अधिक प्रेरित करायचS? यावर गंभीर हसला आणि म्हणाला, ‘मैदानावर तू माझ्यापेक्षा जास्त भिडला आहेस, मला वाटतं तू या प्रश्नाचं उत्तर माझ्यापेक्षा चांगलं देऊ शकतोस.’ विराटने हे मान्य केले आणि म्हणाला, ‘मी अशा व्यक्तीच्या शोधात आहे जो माझ्या बोलण्याशी सहमत असेल, मी असे म्हणत नाही आहे की ते चुकीचे आहे, मी विचार करतोय की कोणीतरी म्हणायला हवे की हो, असेच होते.’