Rahul Dravid And Virat Kohli in Dominica Test: भारतीय संघ १२ जुलैपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी तयारी करत आहे. याबरोबरच टीम इंडियाचा कॅरेबियन बेटावरील दोन महिन्यांचा दौराही सुरू होणार आहे. २०१७ नंतर विंडसर पार्क येथे होणारी ही पहिली कसोटी असेल आणि एकूण पाचवी कसोटी सामने या मैदानावर झाले आहेत. योगायोगाने डॉमिनिका येथे खेळली गेलेली पहिली कसोटीही भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातच होती. तो सामना जुलै २०११ मध्ये खेळला गेला होता आणि सध्याच्या संघासोबत असलेला विराट कोहली हा त्या भारतीय संघातील एकमेव खेळाडू आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्या कसोटीत राहुल द्रविड देखील खेळला होता, जो आज टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे.
भारतीय संघ विंडसर पार्क, रोसेओ, डॉमिनिका येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात करणार आहे. टीम इंडियाने शेवटचा कसोटी सामना २०११ मध्ये येथे खेळला होता. त्या सामन्यात विराट कोहलीसोबत सध्याचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविड देखील टीम इंडियाचा एक भाग होता. याचा खुलासा खुद्द विराट कोहलीने केला आहे.
कोहलीने त्याच्या अधिकृत सोशल मीडियाद्वारे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसोबतचा एक फोटो शेअर केला आणि सांगितले की डॉमिनिका येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटीत फक्त दोन खेळाडू संघाचा भाग होते. कोहलीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “२०११ मध्ये डॉमिनिका येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटीत फक्त दोनच खेळाडू होते. हा दौरा आपल्याला वेगवेगळ्या रूपात इथे परत आणेल असा कधी विचारच केला नव्हता. मी आज खूप भारावून गेलो आहे.”
भारतीय संघाने त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळली, ज्यामध्ये तिसरी कसोटी डॉमिनिका येथे खेळली गेली आणि सामना अनिर्णित राहिला. या सामन्याच्या पहिल्या डावात राहुल द्रविडने ५ धावा आणि दुसऱ्या डावात ३४ धावा केल्या. त्याचवेळी विराट कोहलीने एकच डाव खेळला होता त्यात त्याने ३० धावा केल्या होत्या.
तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्याने भारतीय संघाने मालिका १-० अशी जिंकली होती. विराट कोहलीची ही पदार्पण कसोटी मालिका होती. या मालिकेतील पहिल्याच सामन्यातून विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विराट कोहली आणि राहुल द्रविड यांनी वेस्ट इंडिजमध्ये शेवटची कसोटी मालिका एकत्र खेळण्याची ही शेवटची वेळ होती.
दोन्ही खेळाडू त्यावेळी त्यांच्या कारकिर्दीच्या विरुद्ध टोकाला होते. राहुल द्रविड आणि त्याचा दीर्घकाळचा साथीदार व्हीव्हीएस लक्ष्मण यांची शानदार कारकीर्द वेस्ट इंडिजमधील शेवटच्या कसोटीत संपुष्टात आली. दुसरीकडे विराट कोहलीने मालिकेतील पहिल्याच सामन्यात कसोटी पदार्पण केले. माजी अष्टपैलू डॅरेन सॅमीच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी केली आणि इशांत शर्माच्या पाच विकेट्सच्या जोरावर २०४ धावांत टीम इंडियाने गुंडाळले. कर्णधार एम.एस. धोनीच्या १३३ चेंडूत ७४ धावांच्या जोरावर भारताने ३४७ धावा केल्या होत्या.
कसोटीनंतर वन डे आणि टी२० मालिका होणार आहेत
माहितीसाठी की, २ कसोटी सामन्यांनंतर भारत आणि वेस्ट इंडिजचे संघ ३ वन डे आणि ५ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिकाही खेळणार आहेत. २७ जुलै, गुरुवारपासून एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. यानंतर ३ ऑगस्ट, गुरुवारपासून टी२० मालिका सुरू होईल. टीम इंडिया या दौऱ्यातील शेवटचा सामना १३ ऑगस्ट, रविवारी फ्लोरिडामध्ये खेळणार आहे.