भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज विराट कोहली आपल्या धडाकेबाज खेळासाठी ओळखला जातो. मात्र, गेल्या काही काळापासून विराट खराब फॉर्मचा सामना करत आहे. नुकत्याच पार पडलेल्या इंडियन क्रिकेट प्रीमियर लीग या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत तर तो धावा जमवण्यासाठी अक्षरश: झगडताना दिसला. मैदानावर त्याची बॅट शांत असली तरी मैदानाच्याबाहेर मात्र, तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. विराट कोहलीने नुकतेच सोशल मीडिया साईट असलेल्या इन्स्टाग्रामवर २० कोटी फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे. अशी कामगिरी करून त्याने मैदानाबाहेर एक नवीन विक्रमच नोंदवला आहे.

विराट कोहलीने मैदानावर चांगली कामगिरी करो अथवा नाही, त्याच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सोशल मीडियावरील त्याच्या चाहत्यांचा आकडा बघून याची कल्पना केली जाऊ शकते. इन्स्टाग्रामवर विराट कोहलीचे २० कोटींहून (२०० दसलक्ष) अधिक फॉलोअर्स झाले आहेत. स्वत: विराटने पोस्ट करून आपल्या या कामगिरीबाबत माहिती दिली. २० कोटींहून अधिक फॉलोअर्स असलेला तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स असलेल्या जागतिक स्तरावरील खेळाडूंच्या यादीमध्ये विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. पोर्तुगालचा तारांकित फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो पहिल्या स्थानावर आहे. त्याचे ४५१ दशलक्ष (४५.१ कोटी) फॉलोअर्स आहेत. रोनाल्डोनंतर अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा क्रमांक लागतो. मेस्सीला इन्स्टाग्रामवर ३३४ दशलक्ष (३३.४ कोटी) चाहते फॉलो करतात.

हेही वाचा – रवी शास्त्रींच्या एका ट्विटने मिळाला ३६ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा, जाणून घ्या संपूर्ण गोष्ट

विशेष म्हणजे तो इन्स्टाग्रामच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाईदेखील करतो. एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी विराट कोहलीला पाच कोटी रुपये मिळतात. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून इतकी कमाई करणारा तो पहिला भारतीय खेळाडू आणि जगातील १९वा सेलिब्रिटी आहे.

Story img Loader