Virat Kohli completes 16000 runs in Asia in IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने चांगली फलंदाजी केली आणि शानदार अर्धशतक झळकावले. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळला नाही. तर दुसऱ्या सामन्यात तो फक्त ६ धावा करू शकला. अशा परिस्थितीत, २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी त्याचे फॉर्ममध्ये पुनरागमन होणे ही टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे. कारण एकदा त्याची बॅट धावांच्या रुपाने आग ओकायला लागली की, विरोधी संघ अडचणीत येतात.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने ५५ चेंडूत ५२ धावा केल्या, ज्यात ७ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. यासह त्याने आशियातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६००० धावा पूर्ण केल्या. तो आशियामध्ये सर्वात जलद १६००० धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने हे फक्त ३४० डावांमध्ये केले आहे आणि नंबर-१ स्थान मिळवले आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आशियामध्ये ३५३ डावांमध्ये १६००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या होत्या. आतापर्यंत आशियामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त चार फलंदाजांनी सोळा हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

आशियामध्ये सर्वात जलद १६००० धावा पूर्ण करणारे फलंदाज :

  • विराट कोहली – ३४० डाव
  • सचिन तेंडुलकर – ३५३ डाव
  • कुमार संगकारा – ३६० डाव
  • महेला जयवर्धने – ४०१ डाव

विराट कोहलीची गणना भारताच्या महान खेळाडूंमध्ये होते आणि त्याने एकट्याने अनेक सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. एकदा तो क्रीजवर स्थिरावला की त्याला रोखणे कठीण होते. त्याने आतापर्यंत आशियामध्ये ३१२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण १६०२५ धावा केल्या आहेत, ज्यात ५२ शतके आणि ७९ अर्धशतकांचा समावेश आहे.

विराट कोहलीच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं –

विराट कोहली हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत २९७ सामन्यांमध्ये एकूण १३९६३ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर ५० शतके आहेत. जेव्हा कोहली त्याच्या लयीत असतो तेव्हा तो काही चेंडूंमध्ये सामन्याचा मार्ग बदलू शकतो. आता तो इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावून फॉर्ममध्ये परतला आहे.

Story img Loader