ऑस्ट्रेलियावारीत कर्णधार विराट कोहलीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ऑस्ट्रेलियात एकाच कसोटी मालिकेत सर्वाधिक धावसंख्या करण्याच्या विक्रमाची नोंद राहुल द्रविडच्या नावावर होती. राहुल द्रविडने २००३ साली ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत तब्बल ६१९ धावा कुटल्या होत्या तर, लक्ष्मणने त्याच कसोटी मालिकेत ४९४ धावांचा रतीब घातला होता. लक्ष्मण पाठोपाठ मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकाच कसोटी मालिकेत ४९३ धावा २००७ साली ठोकल्या होत्या. कर्णधार कोहलीने यंदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत ६३९ धावा ठोकल्या असून ऑस्ट्रेलियात एकाच कसोटी मालिकेत सर्वाधिक धावसंख्या करण्याच्या विक्रमाला गवसणी घातली आहे. या कसोटी मालिकेत कोहलीने दमदार ४ शतके ठोकली आहेत. चौथ्या कसोटीच्या तिसऱया दिवसाअखेर कोहली १४० धावांवर नाबाद आहे.
ऑस्ट्रेलियावारीवर असलेली युवा टीम इंडिया ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा संघर्ष करत आहे. एक आक्रमक खेळाडू म्हणून ओळख असली तरी, संयमी फलंदाजी आणि कर्णधारपदाची धुरा खांद्यावर असणाऱया विराट कोहली या युवा पठ्ठ्याने सिडनीच्या स्टेडियमवर सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत हा विक्रम केला. कोहलीने संयमी खेळींचा बादशाह राहुल द्रविडचा विक्रम मोडीत काढला. स्वभावाने आक्रमक असल्याने कसोटीत खेळण्याचा संयम नसल्याची टीका आजवर कोहलीवर अनेकदा झाली आणि कोहलीने या टीकांचे उत्तर आपल्या बॅटने दिले.
ऑस्ट्रेलियावारी म्हणजे भारतीय फलंदाजांचा कस पाहणारी. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीस पोषक असणाऱया खेळपट्ट्यांवर उसळी घेणारे चेंडु म्हणजे भारतीय फलंदाजांच्या नाकी नऊ आणणारे असे जणू शिक्कामोर्तबच झाले होते परंतु, माजी फलंदाज राहुल द्रविड आणि लक्ष्मण या शिलेदारांनी ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्यांवर गोलंदाज आणि उसळी चेंडुंचा समाचार घेतल्यानंतर भारतीय फलंदाजीवर होणाऱया टीकांना पूर्णविराम मिळाला होता. या जोडगोळीने ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर तासनतास उभे राहून गोलंदाजांना अक्षरश: सतवून काढले. द्रविड-लक्ष्मण यांच्या ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवरील भागीदाऱया आजही कसोटी क्रिकेटमध्ये आदर्श मानल्या जातात. कोहलीनेही यंदा ऑस्ट्रेलियावारीत दमदार कामगिरी करून आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवले.
सिडनी कसोटी: कोहली, लोकेशचे दमदार शतक, टीम इंडिया ५ बाद ३४२

 

Story img Loader