एकाबाजूला चित्रपटरसिकांना ‘सैराट’ चित्रपटाने ‘याड लावलं’ आहे, तर दुसरीकडे क्रिकेटरसिकांना विराट कोहलीच्या फलंदाजीची ‘झिंग’ चढलेली आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात विराट ‘सैराट’ फलंदाजी करत असून त्याने संघ सहकारी ख्रिस गेलचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला आहे. विराटने आयपीएलमध्ये १२ सामन्यांमध्ये तीन खणखणीत शतकं आणि पाच अर्धशतके झळकावून ७५२ धावा ठोकून एका मोसमात सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम स्वत:च्या नावावर करून घेतला आहे.
बेधडक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱया ख्रिस गेल याने २०१२ सालच्या आयपीएलच्या मोसमात १५ डावांत एकूण ७३३ धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडीत विराटने यंदाच्या मोसमात आतापर्यंत ७५२ धावांचा पाऊस पाडला आहे. तेही केवळ १२ डावांत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू-
# विराट कोहली- ७५२* (२०१६)
# ख्रिस गेल- ७३३ (२०१२)
# मायकेल हसी- ७३३ (२०१३)
# ख्रिस गेल- ७०८ (२०१३)
# रॉबीन उथप्पा- ६६० (२०१४)
# विराट कोहली- ६३४ (२०१३)