Virat Kohli broke Sachin Tendukar’s record: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या हंगामाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा २०९ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक सामन्यात भारतीय संघाला सामन्याच्या चौथ्या डावात विजयासाठी ४४४ धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण टीम इंडियाने खेळाच्या ५व्या दिवशी २३४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून या डावात नॅथन लायनने ४ तर स्कॉट बोलंडने ३ बळी घेतले. या दरम्यान विराट कोहलीने आपल्या छोट्याशा खेळीच्या जोरावर सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ च्या अंतिम सामन्याच्या दुसऱ्या डावात, विराट कोहलीला स्कॉट बोलंडने स्लिपमध्ये स्टीव्ह स्मिथकडे झेलबाद झाला. तो ४९ धावा करून बाद झाला. सामन्याच्या चौथ्या दिवशी कोहलीने चांगली फलंदाजी केली होती आणि ४४ धावांवर नाबाद माघारी परतला, पण पाचव्या दिवशी तो केवळ ५ धावांनी आपली धावसंख्या वाढवू शकला. तसेच एका धावेने त्याचे अर्धशतक हुकले. कोहलीने दुसऱ्या डावात ७८ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ही खेळी केली.
कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला –
विराट कोहलीचे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या अंतिम सामन्यात अर्धशतक केवळ एका धावेने हुकले असेल, पण तो आयसीसीच्या नॉकआउट सामन्यात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. कोहलीपूर्वी, सचिन तेंडुलकर भारताकडून आयसीसीच्या नॉकआउट सामन्यात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर होता, पण आता तो दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.
विराट कोहलीने आतापर्यंत आयसीसीच्या नॉकआउट सामन्यात भारतासाठी ६८३ धावा केल्या आहेत, तर सचिन तेंडुलकरने ६५७ धावा केल्या आहेत. जर आयसीसीच्या नॉकआउट सामन्याबद्दल बोलायचे, तर रिकी पाँटिंग ७३१ धावा करून पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आणि सचिन तेंडुलकर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच वेळी, रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे, तर भारतासाठी आयसीसीच्या नॉकआउट सामन्यात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर एकूण खेळाडूंच्या यादीत कुमार संगकारा पाचव्या क्रमांकावर आहे.
आयसीसीच्या नॉकआउट सामन्यात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (सरासरी) –
७३१ धावा – रिकी पाँटिंग (४५.६८)
६८३ धावा – विराट कोहली (५२.१५)
६५७ धावा – सचिन तेंडुलकर (५०.५३)
६२० धावा – रोहित शर्मा (४४.२८)
५९५ धावा – कुमार संगकारा (३९.६६)
हेही वाचा – KL Rahul: केएल राहुल ‘या’ मोठ्या स्पर्धेद्वारे मैदानात करु शकतो पुनरागमन, लवकरच एनसीएमध्ये होणार दाखल
सामन्याबद्दल बोलायचे, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४६९ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने प्रत्युत्तरात आपल्या पहिल्या डावात सर्वबाद २९६ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ८ बाद २७० धावांवर घोषित केला. यानंतर ऑस्ट्रेलियाने दोन्ही डावाच्या जोरावर भारतीय संघासमोर ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले. ज्याचा पाठलाग करताना भारतीय संघ आपल्या दुसऱ्या डावात २३४ धावांवर गारद झाला.