IND vs ENG 3rd ODI Updates in Marathi: विराट कोहलीने इंग्लंडविरूद्ध तिसऱ्या वनडेमध्ये अर्धशतक झळकावत आपला फॉर्म परत मिळवला आहे. विराट कोहलीने ५५ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५२ धावांची शानदार खेळी केली. विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पुन्हा आपल्या जुन्या अंदाजात परतला आहे, ही टीम इंडियासाठी चांगली गोष्ट आहे. विराट कोहलीने या अर्धशतकी खेळीमध्ये दोन विक्रम आपल्या नावे केले आहेत.

विराट कोहलीने या शतकी खेळीदरम्यान क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला आहे. इंग्लंडविरूद्ध वनडेमध्ये त्याने ही कामगिरी आपल्या नावे केली. याशिवाय सर्वात कमी डावात १६ हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो आशियातील फलंदाज ठरला आहे.

रोहित शर्मा दुसऱ्याच षटकात १ धाव करून बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि शुबमन गिलने भारताचा डाव सावरला. विराट कोहलीने शुबमन गिलच्या साथीने आघाडी घेत १० षटकांत संघाची धावसंख्या ५० धावांच्या पुढे नेली. ११व्या षटकापर्यंत गिल आणि कोहली यांच्यात ५० धावांची भागीदारी झाली. यानंतर दोघांनी वेगवान धावा करत भारताला १३ षटकांत ७९ धावांपर्यंत नेले. यादरम्यान कोहलीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात १६ धावांचा टप्पा गाठून विराट कोहलीने इंग्लिश संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४००० धावा पूर्ण केल्या. इंग्लंडविरुद्ध ४००० धावा करणारा तो पहिला भारतीय ठरला. यादरम्यान विराटने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला. यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकर होता. सचिनने इंग्लंडविरुद्ध ३९९० धावा केल्या होत्या. आता विराट कोहली पुढे गेला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू

४००० – विराट कोहली*
३९९० – सचिन तेंडुलकर
२९९९ – एमएस धोनी
२९९३ – राहुल द्रविड
२९१९ – सुनील गावस्कर
२४६० – रोहित शर्मा</p>

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या संघाविरुद्ध ४ हजार धावा पूर्ण केल्या. अशाप्रकारे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ वेगवेगळ्या संघांविरुद्ध ४ हजार धावा करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. इंग्लंडपूर्वी त्याने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध ही मोठी कामगिरी केली होती.

विराट कोहलीने आपल्या अर्धशतकी खेळीद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आशिया खंडात १६ हजार धावा पूर्ण करून सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला आहे. कोहलीने आपल्या ३४०व्या डावात ही कामगिरी केली आहे. तर सचिनने आशिया खंडात ३५३ डावात १६ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. श्रीलंकेच्या कुमार संगकाराने ३६० डावात हा विक्रम केला होता आणि श्रीलंकेचा आणखी एक दिग्गज महेला जयवर्धनेने ४०१ डावात हा विक्रम केला होता.

Story img Loader