‘बीसीसीआय’चे पदाधिकारी नाराज; गांगुलीचा मात्र मत व्यक्त करण्यास नकार

भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने बुधवारी एकामागून एक गौप्यस्फोट केल्यानंतर गुरुवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने यासंबंधी स्पष्ट मत व्यक्त करण्यास नकार दिला. ‘बीसीसीआय’ सदर प्रकरण हाताळण्यास सक्षम आहे, असे सांगत गांगुलीने प्रकरण न वाढवण्याला प्राधान्य दिले.

गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्याच्या ९० मिनिटांपूर्वी कोहलीकडून एकदिवसीय प्रकारातील कर्णधारपद काढून घेण्यात आले. मर्यादित षटकांच्या प्रकारांत एकच कर्णधार असावा या हेतूने मुंबईकर रोहित शर्माकडे एकदिवसीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. कोहलीला ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे सुचवल्याचे गांगुली काही दिवसांपूर्वी म्हणाला.

मात्र कोहलीने बुधवारी पत्रकार परिषदेदरम्यान केलेल्या विधानांमुळे त्याच्यातील आणि बीसीसीआयमधील विसंवाद समोर आला. बीसीसीआयने एकदाही ट्वेन्टी-२० संघाच्या नेतृत्वत्यागाबाबत पुनर्विचार करण्याचे सुचवले नाही, असे कोहलीने नमूद केले. त्यामुळे गांगुली यानंतर काही म्हणणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून होते.

‘‘कोणतेही वक्तव्य करणार नाही. कोणतीही पत्रकार परिषद घेणार नाही. ‘बीसीसीआय’ हे प्रकरण योग्यप्रकारे हाताळेल. त्यामुळे अन्य कोणी यामध्ये पडू नये,’’असे गांगुली म्हणाला. दरम्यान, या सर्व घडामोडींनंतर बीसीसीआय कोहलीवर कोणती कारवाई करणार की त्याच्याशी संवाद साधून मतभेद दूर करणार, हे पाहणे रंजक ठरेल.

भारतीय संघ आफ्रिकेत दाखल

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी गुरुवारी भारतीय संघाचे जोहान्सबर्ग येथे आगमन झाले. बीसीसीआयने ट्विटरवर यासंदर्भातील छायाचित्रे पोस्ट केली. उभय संघांतील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला २६ डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून त्यानंतर ते तीन एकदिवसीय लढतीही खेळणार आहेत.

कोहलीच्या स्पष्टीकरणाची वेळ चुकली -कपिल

कोहलीने केलेल्या विधानांमुळे त्याचा बीसीसीआयशी असलेला विसंवाद उघडकीस आला आहे. मात्र दक्षिण आफ्रिकासारख्या महत्त्वपूर्ण दौऱ्यापूर्वी त्याने गौप्यस्फोट केल्यामुळे संघातील वातावरण बिघडू शकते, अशी भीती भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केली. ‘‘एकमेकांकडे बोट दाखवून काहीही साध्य होणार नाही. सध्या आफ्रिका दौरा महत्त्वाचा असून कोहलीसह सर्व खेळाडूंनी त्यावर लक्ष केंद्रित करावे. कोहलीनेसुद्धा चुकीच्या वेळी वादग्रस्त विधान केल्याने संघातील वातावरण डळमळीत होऊ शकते. त्यामुळे कोहली आणि गांगुली यांनी एकत्रित येऊन आपापसांतील विसंवाद दूर करावा,’’ असे ६२ वर्षीय कपिल म्हणाले.

गांगुलीने गुंता सोडवावा -गावस्कर

कोहलीने केलेल्या विरोधाभासी विधानांमुळे चाहत्यांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले असून ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष गांगुलीच हे प्रकरण मिटवू शकतो, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले. ‘‘कोहलीच्या विधानामुळे बीसीसीआय पूर्णपणे दोषी ठरत नाही. फक्त कोहलीला ट्वेन्टी-२० कर्णधारपदाबाबत पुनर्विचार करण्यास सांगणारा व्यक्ती कोण होता, बीसीसीआयचा उद्देश त्याला कशाप्रकारे समजवण्यात आला, हे जाणून घेणे गरजेचे आहे, गांगुलीच या प्रकरणात पारदर्शकता आणू शकतो,’’ असे गावस्कर म्हणाले.

Story img Loader