भारतीय संघाचा ‘रनमशीन’ असलेला विराट कोहली आणि बॉलीवूडमध्ये प्रत्येक सिनेमागणिक अभिनेत्री म्हणून ठसा उमटवणारी अनुष्का शर्मा यांची प्रेमकहाणी चांगलीच बहरते आहे. त्यामुळेच विराटला पाठिंबा देण्यासाठी अनुष्का थेट मेलबर्नमध्ये पोहचली. रविवारी अनुष्का स्टेडियममध्ये अवतरली आणि विराटचा नूरच पालटला.
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घेत शतक पूर्ण करणाऱ्या विराटने अनुष्काच्या दिशेने ‘फ्लाइंग किस’ दिला आणि एरव्ही बिनधास्त असणारी अनुष्काही लाजली. शतकानंतर गर्लफ्रेंड किंवा पत्नीला उद्देशून ‘फ्लाइंग किस’ देत प्रेम व्यक्त करण्याची रीत रिकी पॉन्टिंगची. पॉन्टिंगच्याच ऑस्ट्रेलियात विराटने हा प्रेमळ कित्ता गिरवला आहे.
इंग्लंड दौऱ्यात अनुष्काच्या असण्याने विराटची कामगिरी खालावली अशा चर्चाना उधाण आले होते. मात्र अनुष्काच्या उपस्थितीतही मी दमदार खेळ करू शकतो, असे विराटने यावेळी सूचित केले आहे.
श्ॉम्पूच्या जाहिरात चित्रीकरणापासून ओळख झालेली दिल्लीकरांची ही जोडी आता क्रिकेट-बॉलीवूड युगुल समीकरणाचे नवे पर्व. काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात अनुष्का उपस्थित होती. त्यावेळी अर्धशतक पूर्ण केल्यानंतर विराटने अनुष्काच्या दिशेने ‘फ्लाइंग किस’ दिला होता. छुप्या प्रेमप्रकरणापेक्षा ‘प्रेम करुया खुल्लमखुल्ला’ हा मार्ग विराट-अनुष्काने स्वीकारला आहे. विशेष म्हणजे गोलंदाजी करताना शेरेबाजी करणाऱ्या मिचेल जॉन्सनला उद्देशूनही विराटने ‘फ्लाइंग किस’ देत खुन्नस व्यक्त केली.

Story img Loader