Virat Kohli First Call Childhood Coach After Century Watch Video: भारताचा रनमशीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या विराट कोहलीची बॅट पुन्हा एकदा पाकिस्तानविरूद्ध चांगलीच तळपली. चॅम्पियन्स ट्रॉफीतील पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात विराटने शतक झळकावत संघाला शानदार विजय मिळवून दिला. विराटने दुबईच्या मैदानावर १११ चेंडूत १०० धावा करत आपले शतक पूर्ण केले. गेला बराच काळ फॉर्मशी झगडत असलेल्या विराटने शानदार पुनरागमन केले आणि संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. यादरम्यान कोहलीचे बालपणीचे कोच राजकुमार शर्मा यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.

विराट कोहलीचे वनडे क्रिकेटमधील ५१वे एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ८२वे शतक आहे. कोहलीने १५ महिन्यांनंतर वनडे फॉरमॅटमध्ये शतक झळकावण्याचा पराक्रम केला. शतक झळकावल्यानंतर कोहलीने गुरू राजकुमार शर्मा यांना फोन केला. जे कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक आहेत.

कोहलीने बालपणीचे कोच राजकुमार यांना फोन केला तेव्हा ते रोहित जुगलनला मुलाखत देत होते. राजकुमार यांनी त्यांचा फोनवर कॉल येत असल्याचे पाहिले आणि त्यांना पाहताच कळलं की विराट कोहली कॉल करत आहे. कोच यांनी थेट मुलाखत थांबवत विराटचा फोन घेतला आणि लांब जाऊन त्याच्याशी कॉल वरून बोलून परतले. कोहलीने फोन करताच राजकुमार म्हणाले, “त्याचाच कॉल आहे.” फोनवर बोलून जुगलन यांनी राजकुमार यांना विचारलं, कोहलीशी काय बोलणं झालं? प्रत्युत्तरात राजकुमार म्हणाले, “त्याच्या शतकाबद्दल मी त्याचं अभिनंदन केले. अशा यशाबद्दल आनंद वाटतो.” या व्हिडिओवर कोहलीच्या चाहत्यांकडून प्रचंड प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने कमेंट केली की, “एवढा मोठा खेळाडू असूनही, आजही कोहली त्याच्या प्रशिक्षकांच्या इतका जवळ आहे..”

कोहलीच्या या धाडसी खेळीमुळे कोच राजकुमार यांना खूप आनंद आणि दिलासा वाटत आहे. कोच राजकुमार यांना आशा आहे की कोहलीच्या फॉर्मवर आता तरी प्रश्न उपस्थित होणं थांबेल. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर एका व्हिडिओमध्ये राजकुमार यांनी पीटीआयला सांगितले की, “आता तुम्ही विराट फॉर्ममध्ये नाही, असं विचारणार नाही.” ते म्हणाले, “मी नेहमी म्हणत आलो की तो एक मोठी खेळी खेळणारा खेळाडू आहे आणि त्याने आज पुन्हा ते सिद्ध केले. त्याने नेहमीच मजबूत संघांविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे,” गेल्या अनेक वर्षांपासून तो हे करत आला आहे. देशासाठी सर्वाधिक सामने जिंकणारा तो खेळाडू आहे,”असं कोच राजकुमार म्हणाले.

कोहलीने या डावात वनडेमध्ये १४ हजार धावाही पूर्ण केल्या. सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा यांच्यानंतर ही कामगिरी करणारा तो जगातील तिसरा फलंदाज आहे. पण सर्वात कमी डावांमध्ये ही कामगिरी करणारा तो जगातील पहिला गोलंदाज आहे. शर्मा यांनी ही मोठी कामगिरी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५१वे शतक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ८२वे शतक झळकावण्याबरोबरच, त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १४ हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. ही एक मोठी कामगिरी आहे. मला त्याचा अभिमान आहे की, त्याने संपूर्ण देशाचा गौरव केला आहे. त्याने देशाला आनंद साजरा करण्याची संधी दिली याचा आम्ही सर्वांना खूप आनंद आहे.”

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताशिवाय न्यूझीलंडनेही उपांत्य फेरीत प्रवेश केला. बांगलादेश आणि यजमान पाकिस्तान या स्पर्धेतून बाहेर आहेत.

Story img Loader