दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेमधून विराट कोहलीनं माघार घेत विश्रांतीसाठी वेळ मागितल्याची जोरदार चर्चा रंगू लागली होती. रोहित शर्मासोबत वाद असल्यामुळेच विराट कोहलीनं एकदिवसीय मालिकेतून माघार घेतल्याचं देखील बोललं जात होतं. त्यासंदर्भात अखेर विराट कोहलीनं मौन सोडलं असून या सर्व अफवा असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. “मी एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध होतो आणि आहे, तुम्ही हे प्रश्न विचारायलाच नकोत”, असं विराट कोहली म्हणाला आहे. पत्रकार परिषदेमध्य माध्यमांनी यासंदर्भात विचारणा केल्यानंतर विराट कोहलीनं यावर सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.
“मी एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध आहे आणि होतो. तुम्ही हे प्रश्न मला विचारायलाच नकोत. तुम्ही हे प्रश्न त्यांना विचारायला हवेत, जे यासंदर्भात चुकीच्या गोष्टी लिहीत आहेत. माझं म्हणाल तर मी सिलेक्शनसाठी उपलब्ध आहे. मी नेहमीच खेळण्यासाठी इच्छुक असतो”, असं विराट कोहली म्हणाला.
नेमका काय झाला वाद?
टी-२० वर्ल्डकपनंतर विराट कोहली टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून स्वत:हून पायउतार झाला. त्यावेळी एकदिवसीय संघाचं देखील कर्णधारपद विराट कोहलीला सोडावं लागेल, अशी चर्चा सुरू झाली होती. घडलंही तसंच. न्यूझीलंड दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करताना बीसीसीआयनं एकदिवसीय संघाचं कर्णधारपद देखील रोहीत शर्माकडे दिल्याचं जाहीर केलं. त्यामुळे विराट कोहली दुखावल्याची चर्चा सुरू झाली.
यानंतर विराट कोहली आणि रोहीत शर्मा यांच्यामध्ये वाद सुरू झाल्याचं बोललं जाऊ लागलं. त्याच आधारावर रोहीत शर्मानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेतून माघार घेतल्याचं जाहीर केलं, तर विराट कोहली देखील एकदिवसीय मालिकेतून विश्रांतीसाठी माघार घेणार असल्याचं सांगितलं जाऊ लागलं. त्यामुळे रोहीत शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील वादावर जोरदार चर्चा रंगू लागली.
भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अजरुद्दीननं देखील यासंदर्भात ट्वीट करत दोघांनी विश्रांतीसाठी माघार घेण्याचं टायमिंग चुकीचं असल्याचं नमूद केलं होतं. त्यामुळे यावर अनेक तर्क लढवले जात असताना आता खुद्द विराट कोहलीनंच यावर स्पष्टीकरण दिलं आह.