India vs Bangladesh 1st Day 2 Highlights: भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईमध्ये खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने ३ विकेट्स गमावत ८१ धावा केल्या आहेत. यासह भारताने पहिल्या कसोटीत ३०१ धावांची आघाडी मिळवली आहे. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना विराट कोहली १७ धावा करत बाद झाला. पण या १७ धावांच्या खेळीतही विराटने एक मोठी कामगिरी केली आहे. तो एका विशेष यादीत सामील झाला आहे, ज्यामध्ये भारताचा खेळाडू म्हणून फक्त सचिन तेंडुलकरच्या नावाचा समावेश आहे.

हेही वाचा – Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह चारशे पार; कपिल देव, शमी, झहीर यांच्या मांदियाळीत पटकावले स्थान

विराट कोहलीच्या नावे मोठी कामगिरी

चेन्नई कसोटी काही विराटसाठी काही खास राहिली नाही. कारण या कसोटीत विराटला फार मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पहिल्या डावात तो केवळ ६ धावा करून बाद झाला. तर दुसऱ्या डावात विराट कोहली १७ धावा करत बाद झाला. या दुसऱ्या डावातील फलंदाजीदरम्यान ५ धावा करताच त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. विराट कोहलीने भारतात १२ हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो भारताचा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याचवेळी, विराट हा जगातील केवळ ५वा फलंदाज आहे, ज्याने आपल्या घरच्या मैदानावर १२ हजार आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.

हेही वाचा – ENG vs AUS: ट्रेव्हिस हेडने विक्रमी खेळीसह मोडला रोहित शर्माचा वनडेमधील मोठा विक्रम, ‘बॅझबॉल’चाही उडवला धुव्वा

खास क्लबमध्ये कोहलीने मिळवले स्थान

घरच्या मैदानावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने भारतात एकूण १४,१९२ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग १३११७ धावांसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. जॅक कॅलिसनेही दक्षिण आफ्रिकेत १२३०५ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर कुमार संगकारालाही श्रीलंकेत १२०४३ धावा करण्यात यश आले. आता या महान खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचाही समावेश झाला आहे.

विराट कोहली अजून एक मोठ्या विक्रमाच्या जवळ आला आहे. विराटने जर या मालिकेत आणखी ३५ धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७ हजार धावा पूर्ण करेल. हा आकडा गाठणारा तो जगातील चौथा फलंदाज ठरणार आहे. याआधी केवळ सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग आणि कुमार संगकारा यांनाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७ हजार धावा करता आल्या होत्या.