Virat Kohli Completes 9000 Runs in Test Cricket: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची बॅट बंगळुरूच्या मैदानावर चांगलीच तळपली. न्यूझीलंडविरूद्ध कसोटीच्या दुसऱ्या डावात खेळताना विराटने २०२४ मधील पहिले अर्धशतक झळकावले. एवढेच नाही तर विराटने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या ९ हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. विराट कोहलीने १९७ कसोटी डावांमध्ये ९ हजार धावांचा टप्पा गाठला. विराट कोहलीच्या ९ हजार कसोटी धावा खास आहेत. भारतीय संघाला गरज असताना विराट कोहलीने ही महत्त्वाची कामगिरी केली.

न्यूझीलंड कसोटीत भारताचे दोन्ही सलामीवीर चांगली सुरूवात करून देत बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि सर्फराझ खानने भारताचा डाव उचलून धरला. यादरम्यान विराट कोहलीने शानदार अर्धशतक झळकावत आपला क्लास दाखवून दिला. विराट कोहली दिवसाचा खेळ संपेपर्यंत १०२ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकारासह ७० धावा करत बाद झाला.

हेही वाचा – IND vs NZ: भारतीय संघाने घडवला इतिहास, १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ

विराट कोहलीने या अर्धशतकी खेळीत अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले. कोहलीने ५३ धावा पूर्ण करताच कसोटी क्रिकेटमध्ये ९ हजार धावा पूर्ण केल्या. कसोटीत ९००० धावा करणारा तो चौथा भारतीय फलंदाज आहे. कोहलीपूर्वी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर यांनी ही मोठी कामगिरी केली होती.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

१५९२१ – सचिन तेंडुलकर (५३.७८ सरासरी)
१३२८८ – राहुल द्रविड (५२.३१ सरासरी)
१०१२२ – सुनील गावस्कर (५१.१२ सरासरी)
९०००* – विराट कोहली (४८.९० सरासरी)
८५८६ – वीरेंद्र सेहवाग (४९.३४ सरासरी)

हेही वाचा – IND vs NZ: ऋषभ पंत दुखापतीमुळे फलंदाजीला नाही आला तर त्याच्या जागी कोण खेळणार? काय आहे नियम?

कसोटीत सर्वात जलद ९ हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा चौथा भारतीय फलंदाज आहे. १९७ डावात त्याने ही विशेष कामगिरी आपल्या नावे केली आहे. कसोटीत सर्वात जलद ९ हजार धावा करण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे. द्रविडने १७६ डावांमध्ये ९ हजार कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या.

कसोटीत सर्वात जलद ९ हजार धावा करणारे भारतीय फलंदाज

१७६ डाव – राहुल द्रविड
१७९ डाव – सचिन तेंडुलकर
१९२ डाव – सुनील गावस्कर
१९७ डाव – विराट कोहली*

हेही वाचा – PAK vs ENG: पाकिस्तानने दमदार पुनरागमनासह इंग्लंडचा उडवला धुव्वा, नोमान अलीने विक्रमी ११ विकेट घेत लाजिरवाण्या पराभवाचा घेतला बदला

विराट-सर्फराझची शतकी भागीदारी

यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा बंगळुरू कसोटीत तंबूत परतल्यानंतर विराट कोहलीने भारतीय डावाची जबाबदारी स्वीकारली. कोहलीने आपल्या डावाची सुरुवात सावधगिरीने केली, परंतु क्रिझवर नजर ठेऊन विराटने फठकेबाजीही केली. कोहलीला दुसऱ्या टोकाकडून सरफराज खानचीही चांगली साथ मिळाली. विराट आणि सर्फराझने तिसऱ्या विकेटसाठी १०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी रचली. तुफानी फटकेबाजी करत सर्फराझने अवघ्या ४२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सर्फराजच्या स्फोटक फलंदाजीमुळे कोहलीला क्रीजवर स्थिरावण्यास चांगला वेळ मिळाला.