दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाला इंग्लंडकडून डावाने पराभव स्विकारावा लागला. लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या डावामध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पाठदुखीमुळे मैदानात उशीरा फलंदाजीसाठी उतरला होता. दुसऱ्या डावात विराटला फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. मात्र त्याच्या पाठदुखीमुळे विराट तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. यानंतर विराटनेच तिसऱ्या कसोटीतील आपल्या सहभागाबद्दल सकारात्मकता दर्शवली आहे.

सामना संपल्यानंतर झालेल्या पारितोषीक वितरण समारंभात विराट कोहलीला त्याच्या दुखापतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बोलताना, “तिसरा कसोटी सामना सुरु होण्याआधी ५ दिवसांचा कालावधी आहे. या कालावधीत मी बरा होईन. गेल्या काही दिवसांमध्ये मला पाठीचा त्रास जाणवतो आहे, मात्र हे निव्वळ कामाच्या दबावामुळे होत आहे. मी यातून लवकरच सावरेन”, असा आत्मविश्वास विराटने व्यक्त केला.

दुसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर सपशेल शरणागती पत्करली. एकही फलंदाज जेम्स अँडरसन-स्टुअर्ट ब्रॉड यांच्या समोर तग धरु शकला नाही. दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाने संघात केलेले बदल पराभवासाठी कारणीभूत ठरल्याची प्रतिक्रीया अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर दिली होती. याचसोबत भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनीही शिखर धवनला वगळण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. त्यामुळे सलग दोन कसोटी सामन्यांमधल्या खराब कामगिरीनंतर विराट कोहलीटी टीम इंडिया कशी कामगिरी करते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader