Virat Kohli Controversy: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटर विराट कोहली पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कोहलीने आशिया चषकापूर्वी यो-यो टेस्ट दिली होती आणि त्यात १७.२ रेटिंग गुण मिळाले. त्या टेस्टनंतर विराटने त्याचा फोटो शेअर केला आणि सांगितले की त्याने यो-यो टेस्टमध्ये १७.२ गुण मिळवले आहेत. यानंतर सोशल मीडियावर कोहलीच्या फिटनेसचे कौतुक करण्यात आले, परंतु बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते आवडले नाही आणि सर्व खेळाडूंना गोपनीय माहिती कोणाशीही शेअर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोहलीचा फोटो आणि यो-यो टेस्ट स्कोअर इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर काही तासांतच, भारतीय संघ व्यवस्थापनाने सर्व भारतीय क्रिकेटपटूंसाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खेळाडूंना त्यांचे यो-यो चाचणीचे गुण, जे गोपनीय माहितीच्या अंतर्गत येतात ते, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करू नयेत असे सांगितले आहे.
अहवालात असा दावा करण्यात आला आहे की अलूर, बंगळुरू येथील फिटनेस आणि तयारी शिबिरात उपस्थित असलेल्या सर्व क्रिकेटपटूंना आशिया चषकापूर्वी “मौखिक” मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली होती. एका इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे, कोहलीने खुलासा केला की त्याने यो-यो चाचणी १७.२ गुणांसह उत्तीर्ण केली आहे. BCCIने अनिवार्य केलेले फिटनेस पॅरामीटर १६.५ आहे. विराट कोहलीने यो-यो चाचणीचे स्कोअर जाहीरपणे उघड केल्याने BCCI खूश नव्हते आणि अधिकाऱ्यांनी याची लगेच दखल घेतली. त्यांनी खेळाडूंना आठवण करून दिली की सार्वजनिक ठिकाणी अशी गोपनीय माहिती उघड करणे ‘कराराचा भंग’ होऊ शकते.
मीडिया रिपोर्टमध्ये बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, “खेळाडूंना तोंडी सांगण्यात आले होते की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणतीही गोपनीय बाब पोस्ट करणे टाळावे. ते प्रशिक्षणादरम्यान चित्रे पोस्ट करू शकतात परंतु स्कोअर पोस्ट करणे हा कराराचा भंग आहे.”
आशिया चषकापूर्वी सहा दिवसीय सराव शिबिर
आशिया चषक स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय क्रिकेटपटूंनी अलूर येथील सहा दिवसीय सराव शिबिरात हजेरी लावली आहे. विराट कोहलीशिवाय, भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार हार्दिक पांड्या यांनीही गुरुवारी सुरू झालेल्या शिबिराच्या पहिल्या दिवशी यो-यो चाचणी उत्तीर्ण केली. शिबिरात प्रामुख्याने आशिया चषक संघाचा भाग असलेले आणि वेस्ट इंडिजमधून परतल्यानंतर आयर्लंडचा दौरा न केलेल्या क्रिकेटपटूंचा समावेश आहे. या यादीत कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे.
तीन सामन्यांच्या T20I मालिकेत आयर्लंडला २-०ने पराभूत करणाऱ्या भारतीय संघाचा भाग असलेले जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन आणि तिलक वर्मा शुक्रवारी शिबिरात सामील होण्याची अपेक्षा आहे. शिबिराच्या पहिल्या दिवशी योयो चाचणी वगळता हा सराव मुख्यत्वे इनडोअर सत्रांपुरता मर्यादित होता. शुक्रवारपासून मैदानात सरावावर भर दिला जाणार आहे. आयर्लंडमधून परतणाऱ्या खेळाडूंना यो-यो टेस्टऐवजी स्किल सेट टेस्ट द्यावी लागेल. शिबिरात खेळाडूंची लिपिड प्रोफाइल, रक्तातील साखर, यूरिक ऍसिड, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी १२ आणि डी, क्रिएटिनिन, टेस्टोस्टेरॉन आणि डेक्सा चाचण्यांसह अनेक पॅरामीटर्सवर तपासणी केली जाईल.
फिटनेस दिनचर्याव्यतिरिक्त, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या देखरेखीखाली काही विशेष सत्रे असतील, ज्यामध्ये काल्पनिक सामन्यांची परिस्थिती निर्माण केली जाईल आणि खेळाडूंना त्या परिस्थितीत सामने जिंकावे लागतील. आशिया चषकात भारत आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. टीम इंडिया २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.