विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंका दौऱ्यात दोन्ही मालिका आपल्या खिशात घातल्या आहेत. ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने श्रीलंकेला ३-० अशी धूळ चारली. तर ५ वन-डे सामन्यांच्या मालिकेत सध्या भारताकडे ३-० अशी आघाडी आहे. या मालिका विजयाचा आनंद विराट कोहलीने मोहम्मद शमीच्या मुलीसोबत डान्स करुन साजरा केला आहे. शमीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन विराट कोहलीचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.
मोहम्मद शमीला श्रीलंकेविरुद्ध कसोटी संघात स्थान मिळालं होतं. पल्लकेले कसोटी जिंकल्यानंतर एका छोटेखानी पार्टीमध्ये विराटने शमीची मुलगी आयरासोबत मनसोक्त डान्स केला. यावेळी छोट्या आयरासोबत विराट जर्मन गायक लो बेगाच्या ‘I Got a Girl’ या गाण्यावर एखाद्या लहान मुलासारखा थिरकताना दिसला.
Aairah dance with virat after 3-0 victory @ICC @BCCI @imVkohli @HTSportsNews pic.twitter.com/m1Zg7x94l4
— Mohammed Shami (@MdShami11) August 28, 2017
एखाद्या गाण्यावर विराटने डान्स करण्याची ही पहिली वेळ नाहीये. याआधीही युवराज सिंहच्या लग्नाच्या वेळी आपली गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासोबत विराटने केलेला डान्स सोशल मीडियावर असाच व्हायरल झाला होता. आयपीएलदरम्यान रॉयल चँलेजर्स बंगळुरुकडून खेळताना ख्रिस गेल आणि विराट कोहलीचा डान्सही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाचा चौथा सामना ३१ ऑगस्टरोजी खेळवला जाणार आहे. तर अंतिम सामना हा ३ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. या मालिकेत एकाही सामन्यात श्रीलंकेने भारतीय संघाला प्रतिकार केला नाही. त्यामुळे उर्वरित सामन्यांमध्ये श्रीलंकेचा संघ कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल.