IND vs NZ Virat Kohli David Beckham Football Video: बुधवारी वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध भारताच्या विश्वचषक उपांत्य फेरीसाठी सचिन तेंडुलकर आणि फूटबॉल डेव्हिड बेकहॅम युनिसेफचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी मैदानावर भारतीय क्रिकेट संघाच्या सदस्यांशी संवाद साधला. सचिन तेंडुलकर आणि डेव्हिड बेकहॅम मैदानावर चालत असताना, विराट कोहली व प्रसिद्ध फुटबॉलपटूचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये विराट कोहलीने डेव्हिड बेकहॅमच्या दिशेने फुटबॉल ढकलला होता. त्यावर बेकहॅमने सुद्धा पुन्हा फुटबॉलला किक मारून एक दोन वेळा दोघांनी एकमेकांच्या दिशेने फूटबॉल ढकलत एक सुंदर क्षण शेअर केला होता. बेकहॅमने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ही क्लिप शेअर केली होती.
दुसरीकडे सामना सुरू होण्यापूर्वी सुद्धा डेव्हिडने आपण कोहलीची बॅटिंग पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले होते. विराट कोहलीने ऐतिहासिक शतक झळकावल्यानंतर बेकहॅमने भारताच्या माजी कर्णधारासाठी स्टेडियममध्ये उभे राहून टाळ्या वाजवल्या होत्या.
Video: विराट आणि डेव्हिड बेकहॅम फुटबॉल खेळतात तेव्हा..
दरम्यान, भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या पहिल्या सत्रानंतर अधिकृत प्रसारकांशी बोलताना बेकहॅम म्हणाला: “या स्टेडियममध्ये इतिहासाचा साक्षीदार होणे ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला माहित आहे की आज मी सचिनबरोबर काही वेळ घालवला आहे आणि मला माहित आहे की त्याने या स्टेडियममध्ये काय मिळवलंय , आपल्या देशासाठी आणि खेळासाठी काय कमावलंय, परंतु आज विराटने जे केलं ते अविश्वसनीय आहे. स्टेडियममधील वातावरणात सुद्धा विराटची जादू बघायला मिळते. मी भारतात पहिल्यांदाच आलो आणि मी असं म्हणेन अगदी योग्य वेळी आलो. मी इथे दिवाळीसाठी आलो आहे, मी येथे नवीन वर्षासाठी आलो आहे आणि आता मी विश्वचषकातील माझ्या पहिल्या सामन्यासाठी आलो आहे आणि हा क्षण खूपच खास आहे.”