ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेकडे भारताचा प्रभारी कर्णधार विराट कोहली आक्रमकपणे पाहात आहे. धोकादायक वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनचा सामना करण्याची आम्ही संपूर्ण तयारी केली आहे आणि भारतीय संघ सकारात्मक दृष्टिकोन बाळगून आहे, अशी प्रतिक्रिया कोहलीने व्यक्त केली आहे.
‘‘ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळताना अनुकूल वातावरणापेक्षा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो, कारण वेग आणि उसळणाऱ्या खेळपट्टय़ांचा येथे सामना करायचा असतो; परंतु मानसिकदृष्टय़ा तुम्ही कणखर असाल, तर किती सराव केला, याला महत्त्व उरत नाही,’’ असे कोहलीने सांगितले. सोमवारपासून भारतीय संघाचा क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघाशी दोन दिवसीय सराव सामना सुरू होणार आहे.
‘‘मिचेलची गोलंदाजी लाजवाब आहे, हे सर्वाना माहीत आहे. ऑस्ट्रेलियातील वेगवान आणि उसळणाऱ्या खेळपट्टय़ांवर त्याच्याशी सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. त्याच्याशी आम्ही चांगली लढत देऊ शकू,’’ असे कोहली या वेळी म्हणाला.
महेंद्रसिंग धोनी मनगटाला झालेल्या दुखापतीतून सावरत असताना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचे नेतृत्व कोहलीकडे सोपवण्यात आले आहे. २००८ मध्ये कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने (१९ वर्षांखालील) युवा विश्वविजेतेपद प्राप्त केले होते. नेतृत्वाबाबत कोहली म्हणाला, ‘‘मला संघाचे नेतृत्व करायला आवडते. कर्णधार असायला मला अतिशय आवडते. मी नेहमी पुढाकार घेऊन माझी भूमिका मांडतो आणि आव्हानाला सामोरा जातो. संघ जोपर्यंत पाठीशी राहील आणि आम्हाला अपेक्षित असलेली कामगिरी होईल, तोवर दिवसअखेरीस चांगला निकाल पाहायला मिळेल.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा