Virat Kohli Trolled By Australian Media Calls him Clown: मेलबर्न कसोटीतील वादानंतर विराट कोहली आणि सॅम कोन्स्टास जगभरात चर्चेच विषय बनले आहेत. कोन्स्टासने वयाच्या १९ व्या वर्षी मेलबर्न येथे भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून कसोटी पदार्पण केले होते. पदार्पणातच या फलंदाजाने भारतीय गोलंदाजांची धुलाई करत आक्रमक खेळी केली. दरम्यान, विराट कोहली चालत येत असताना त्याचा कोन्स्टसला धक्का लागला. यामध्ये आयसीसीने कोहलीला मॅच फीच्या २० टक्के दंड ठोठावला आहे. यानंतर आता ऑस्ट्रेलियन मीडियाने विराट कोहलीला जोकर म्हणत त्याचा अपमान केला आहे.
वेस्ट ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने विराट कोहलीचा फोटो प्रकाशित करून त्याला जोकर कोहली म्हटले आहे. याशिवाय विराटच्या फोटोवर जोकरसारखं लाल नाकही लावण्यात आलं आहे. हे तेच ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र आह, ज्यांनी मालिका सुरू होण्याआधी विराट कोहलीला त्याच्या पहिल्या पानावर स्थान देऊन त्याचे कौतुक केले होते. पण १९ वर्षीय क्रिकेटरबरोबर झालेल्या वादानंतर आता ऑस्ट्रेलियन मीडिया माजी कर्णधाराला जोरदार ट्रोल करत आहे.
हेही वाचा – IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात नेमकं काय घडलं? उस्मान ख्वाजाने सांगितला प्रसंगॉ
ऑस्ट्रेलियाच्या डावातील १० व्या आणि ११व्या षटकाच्या दरम्यान स्ट्राईक बदलत असताना विराट आणि कोन्स्टास यांच्यात धक्काबुक्की झाली. विराट कोहली पदार्पण करणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूला जाऊन धडकला. यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. उस्मान ख्वाजा आणि पंचांनी दोघांनाही शांत करून हे प्रकरण मिटवलं. यानंतर विराट कोहलीला ट्रोल केले जात आहे. रिकी पाँटिंगसारखे माजी खेळाडूही विराटची चूक असल्याचे स्पष्ट म्हणाले. पण ऑस्ट्रेलियन मीडियाने विराट कोहलीचा असा फोटो पब्लिश करून त्याला जोकर म्हणत त्याचा अपमान केला आहे.
विराट कोहलीबरोबरच्या धक्काबुक्कीवर सॅम कोन्स्टास चॅनेल७ वर म्हणाला, ‘मला वाटतं की भावनेच्या भरात आमच्याकडून हे झाल असावं. मला काही खललंच नाही, मी माझे ग्लोव्हज घालत होतो तेव्हा अचानक त्याचा खांदा माझ्यावर आदळला. क्रिकेटमध्ये हे सर्व घडत असतं. त्यावेळी २७ धावा करत कोन्स्टास खेळत होता. त्याने पुढच्याच षटकात जसप्रीत बुमराहला दोन चौकार आणि एक षटकार ठोकला. अर्धशतक झळकावल्यानंतर तो रवींद्र जडेजाच्या चेंडूवर पायचीत झाला. कोन्स्टासने ६० धावांच्या खेळीत सहा चौकार आणि दोन षटकार मारले.