Virat Kohli Funny Moments: न्यूलॅंड्स, केपटाऊन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने अविश्वसनीय सुरुवात केली. कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ४५ धावांमध्ये ७ विकेट्स घेत यजमानांचे धाबे दणाणून सोडले. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सकाळच्या सत्रात उत्कृष्ट कामगिरी करताना दिसला. दक्षिण आफ्रिकेच्या स्टेडियममध्ये गंभीर वातावरण असताना भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याच्या एका कृतीने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले. भारतीय वंशाचा दक्षिण आफ्रिकेच्या संघातील खेळाडू केशव महाराज मैदानावर बॅटिंगसाठी येताना कोहलीने केलेली कृती सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. विशेषतः राम मंदिराच्या सोहळ्याची भारतात जय्यत तयारी सुरु असताना कोहलीची कृती खास ठरत आहे.
सहावी विकेट घेतल्यावर महाराज बॅटिंगसाठी मैदानात उतरला. रण मार्को जॅनसेन पॅव्हेलियनमध्ये परतत असताना दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात अवघ्या ३४ धावा होत्या. केशव महाराज मैदानात येत असताना त्याच्या प्रवेशाच्या वेळी ‘राम सिया राम’ हे गाणे वाजत होते. आणि याच वेळी स्लिप्समध्ये क्षेत्ररक्षण करताना कोहलीने ‘धनुष्य आणि बाण’ पोझ दिली आणि दुसऱ्यांदा पोझ दिल्यावर त्याने हात जोडून नमस्कार केल्याची कृती केली.
काही दिवसांपूर्वी, केएल राहुल व केशव महाराज यांच्यातील एक संवाद व्हायरल झाला होता. राहुल महाराजला म्हणाला होता की, “केशव भाई तुम्ही जेव्हाही मैदानात येता, तेव्हा डीजे ‘राम सिया राम’ हे गाणं वाजवतो.” यावर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर ‘महाराज’ हे ऐकून हसत होता.
हे ही वाचा<< राम मंदिरात मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी २२ जानेवारी तारीखच का निवडली? महंतांनी सांगितला खास योगायोग
दरम्यान, सामन्यात परतताना, दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर एडन मार्कराम आणि डीन एल्गर यांनी सावध सुरुवात केली आणि पहिल्या तीन षटकात पाच धावा केल्या. मात्र नंतर मोहम्मद सिराजने टोनी डी झोर्झी (2), डेव्हिड बेडिंगहॅम (12), काइल व्हेरेन (15) आणि मार्को जॅनसेन (0) अशा लागोपाठ विकेट्स घेत सर्वोत्तम गोलंदाजी रेकॉर्ड नोंदवला. याशिवाय जसप्रीत बुमराहनेही पदार्पण करणाऱ्या ट्रिस्टन स्टब्सला शॉर्ट लेगवर झेलबाद करून माघारी धाडले.जसप्रीत बुमराह (२/२५) आणि मुकेश कुमार (२/०) यांनी पूढे प्रत्येकी दोन विकेट घेत प्रोटीज संघाला ५५ धावांत गुंडाळले.