Virat Kohli Emotional Post on Shikhar Dhawan Retirement: शिखर धवनने २४ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आता त्याच्या निवृत्तीवर मित्र विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहली आणि शिखर धवन दीर्घकाळ टीम इंडियासाठी एकत्र खेळले आहेत. दोन्ही खेळाडू चांगले मित्रही आहेत. या दोघांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले. सचिन तेंडुलकरसह अनेक क्रिकेटपटूंनी त्याच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया दिल्या. आता टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि धवनचा मित्र कोहलीनेही त्याच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने धवनचे कौतुक केले असून त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
शिखर धवनच्या निवृत्तीवर विराट कोहली झाला भावुक
विराट कोहलीने शिखरसाठीच्या पोस्टमध्ये त्याचे खूप कौतुक केले आहे. त्याने धवनचे पदार्पण ते भारताचा सर्वात विश्वासार्ह सलामीवीर याबद्दल उल्लेख केला आहे. टीम इंडियामध्ये त्याच्यासोबत घालवलेल्या चांगल्या क्षणांची आठवण करून देताना विराट म्हणाला, “शिखर तुझ्या जबरदस्त पदार्पणापासून ते भारताचा सर्वात विश्वासार्ह सलामीवीर बनण्यापर्यंत, तू आम्हाला जपण्यासारख्या असंख्य आठवणी दिल्या आहेस. तुझी खेळाबद्दलची आवड, खिलाडूवृत्ती आणि तुझी ट्रेडमार्क स्माईल या साऱ्या गोष्टींची खूप आठवण येणार आहे पण तुझा वारसा कायम असणार आहे. आठवणी, अविस्मरणीय परफॉर्मन्स आणि नेहमी मनापासून नेतृत्व केल्याबद्दल धन्यवाद. गब्बर, तुझ्या मैदानाबाहेर पुढील इनिंग्ससाठी तुला शुभेच्छा!”
धवनने निवृत्तीच्या वेळेस कोहलीचा केला उल्लेख
निवृत्तीची घोषणा केल्यानंतर धवनने आपल्या मुलाखतीत जुने दिवसही आठवले. यादरम्यान त्याने विराट कोहलीचे सर्वात मजेदार वर्णन केले. धवन म्हणाला की, तो लहानपणापासून विराटसोबत क्रिकेट खेळत आहे आणि दोघांमध्ये खूप चांगली मैत्री आहे. आयपीएल दरम्यान अनेकवेळा विराट त्याला मुद्दाम आणि चेष्टेने चिडवायचा.
२०१३ ते २०१९ पर्यंत रोहित आणि विराटसह धवनने टीम इंडियासाठी १०० शतके झळकावली. हे त्याचे टीम इंडियातील सोनेरी दिवस होते. विराट कोहली आणि शिखर धवन दीर्घकाळ भारतीय संघाचे मजबूत आधारस्तंभ राहिले. २०१० मध्ये धवनच्या पदार्पणानंतर दोघांनी एकत्र २२१ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या काळात दोघांनी संघासाठी २० हजारांहून अधिक धावा केल्या. शिखर धवनने डिसेंबर २०२२ मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता, जो बांगलादेशविरुद्ध खेळलेला एकदिवसीय सामना होता. यानंतर, ३८ वर्षीय शिखरला टीम इंडियामध्ये आपले स्थान परत मिळवता आले नाही आणि अखेरीस त्याला निवृत्तीचा निर्णय घ्यावा लागला.