आतापर्यंत अनेक वेळा क्रीडा रसिक आणि समीक्षकांनी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच्या खेळाची तुलना केलेली आहे. सचिन तेंडुलकरनेही अनेक वेळा विराट कोहलीच्या खेळाचं कौतुक केलं. सचिनच्या विक्रमांशी बरोबरी करण्याचा आपण विचारही करत नाही, असं विराट कोहलीने आतापर्यंत वारंवार सांगितलेलं आहे. मात्र प्रत्यक्ष मैदानात कोहली हळूहळू सचिनला मागे टाकण्याची तयारी करतोय. श्रीलंकेविरुद्धची वन-डे मालिका ५-० ने जिंकल्यानंतर आयसीसीच्या क्रमवारीत विराटने आपला पहिला क्रमांक कायम राखला आहे. श्रीलंकेविरुद्ध अष्टपैलू खेळ करत कोहलीने या मालिकेतून १४ गुणांची कमाई केली. यासोबत विराटने सचिनच्या जागतिक क्रमवारीत ८८७ गुण मिळवण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराट कोहली व्यतिरिक्त भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने पहिल्या १० फलंदाजांच्या यादीत प्रवेश मिळवला आहे. याचसोबत श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे मालिकेत १५ बळी घेत जसप्रीत बुमराहनेही आयसीसीच्या जागतिक क्रमवारीत मोठी उडी घेतली आहे. ३१ व्या स्थानावरुन बुमराहने चौथ्या स्थानावर झेप घेतली. बुमरहाने केलेली ही कामगिरी त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे.

बुमराहव्यतिरिक्त भारताच्या अक्षर पटेलला पहिल्या १० जणांमध्ये जागा मिळालेली आहे. या दोन गोलंदाजांव्यतिरिक्त हार्दिक पांड्याने आपल्या क्रमवारीत सुधारणा करत ६१ वे, कुलदीप यादवने ८९ व्या स्थानावरुन २१ वे, युझवेंद्र चहलने ९९ व्या स्थानावरुन ५५ वे स्थान पटकावलं आहे. श्रीलंकेला व्हाईट वॉश दिल्यानंतरही भारत जागतिक क्रमवारीत तिसऱ्याच स्थानावर राहिलेला आहे. आयसीसीच्या जागतिक क्रमवारीत भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर एक नजर टाकूयात –

आयसीसीच्या सर्वोत्तम १० फलंदाजांच्या यादीतले भारतीय फलंदाज –
१) विराट कोहली – ८८७ गुण
९) रोहित शर्मा – ७४९ गुण
१०) महेंद्रसिंह धोनी – ७४९ गुण

आयसीसीच्या सर्वोत्तम १० गोलंदाजांच्या यादीतले भारतीय गोलंदाज –
४) जसप्रीत बुमराह – ६८७ गुण
१०) अक्षर पटेल – ६४५ गुण

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli equals record with sachin tendulkar retains top poistion in batting jasprit bumrah enters in top