Virat Kohli says it will be 20 years at RCB after this cycle after IPL 2025 Retention : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबीने विराट कोहलीसह तीन खेळाडूंना आयपीएल २०२५ साठी रिटेन केले आहे. आयपीएल २०२५च्या मेगा ऑक्शनपूर्वी आरसीबीने विराट कोहलीला २१ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे. तो २०२५ मध्ये आरसीबीसाठी १८ वा हंगाम खेळणार आहे. इतके दिवस एकाच फ्रँचायझीसाठी क्रिकेट खेळणारा तो जगातील एकमेव खेळाडू ठरला आहे. या निमित्ताने आरसीबीने विराट कोहलीचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

विराट कोहली काय म्हणाला?

रिटेनशननंतर विराट कोहली आरसीबीच्या एका व्हिडिओमध्ये म्हणाला, “नमस्कार आरसीबी चाहत्यांनो, फ्रँचायझीने मला पुन्हा तीन वर्षांसाठी कायम ठेवलं आहे. मी नेहमीप्रमाणे खूप उत्साही आहे, आरसीबी संघ माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे. हे सगळ्यांनाच माहीत आहे. वर्षानुवर्षे विशेष नातेसंबंध मजबूत होत आहेत आणि मी आरसीबीसाठी खेळताना जे अनुभवले आहे ते खरोखरच खूप खास आहे. मला आशा आहे की चाहते आणि फ्रँचायझीशी संबंधित प्रत्येकासाठी या हंगामाच्या शेवटी हीच भावना असणार आहे. मला आरसीबीकडून खेळताना २० वर्षे होत आली आहेत आणि हीच माझ्यासाठी खूप खास भावना आहे.”

‘मी इतकी वर्षे एकाच संघाकडून खेळेन…’ –

विराट पुढे म्हणाला, “मी इतकी वर्षे एकाच संघाकडून खेळेन असे कधीच वाटले नव्हते, पण गेल्या काही वर्षांमध्ये हे नाते खरोखरच खास बनले आहे आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे मी स्वतःला आरसीबीशिवाय कोणत्याही संघात पाहत नाही. यंदाही रिटेन केल्याबद्दल खूप आनंद झाला आणि होय, लिलावात एक मजबूत नवीन संघ तयार करण्याच्या संधीमुळे खूप उत्साही आहे, ज्यासाठी आपण एक संघ आणि फ्रँचायझी म्हणून उत्सुक आहोत.”

हेही वाचा – राजस्थान रॉयल्सने घेतला सर्वात मोठा निर्णय, स्फोटक जोस बटलरला डच्चू देत ‘या’ तडाखेबंद खेळाडूला दिले प्राधान्य

ट्रॉफी जिंकण्याबद्दल बोलताना विराट म्हणाला, “पुढील ३ वर्षांच्या या चक्रात पुढे पाहताना, साहजिकच किमान आयपीएलचे विजेतेपद जिंकण्याचे लक्ष्य आहे. आम्ही नेहमीप्रमाणेच आमचे सर्वोत्तम प्रयत्न करणार आहोत आणि आमच्या पद्धतीने आमचे क्रिकेट खेळणार आहोत. प्रत्येकाला त्याचा अभिमान वाटावा यासाठी प्रयत्न करु. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या अतुलनीय पाठिंब्याबद्दल सर्व चाहत्यांचे मनःपूर्वक आभार आणि मी तुम्हाला लवकरच चिन्नास्वामी स्टेडियमवर भेटेन, आपली काळजी घ्या.”