ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कालच्या टी२० सामन्यात विराट कोहली लवकर बाद झाल्याने त्याच्या फॉर्म वरून सोशल माध्यमांमध्ये खूप टीका होत आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघाचा सामना विश्वविजेता ऑस्ट्रेलियाशी झाला. पंजाबमधील मोहाली येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला टी२० सामना खेळला गेला. त्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २०८ धावा केल्या. या मोठ्या सामन्यात भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि तो केवळ २ धावा करत माघारी परतला. आशिया चषकाच्या शेवटच्या सामन्यात विराट कोहलीने १२२ धावांची तुफानी खेळी केली होती. ७१वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीचा हा पहिलाच सामना होता. पण तो अप्रतिम खेळी करण्यात अयशस्वी ठरला.
पीसीए स्टेडियमच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी२० सामन्यात विराट कोहलीने एकूण ७ चेंडू खेळले, त्यामध्ये त्याला केवळ २ धावा करता आल्या. पहिल्या तीन चेंडूंमध्ये विराट कोहली एकही धाव घेऊ शकला नव्हता. नंतर मिड-ऑनला नॅथन एलिसच्या चेंडूवर त्याने २ धावा केल्या आणि विराट कोहली साधा झेल देत बाद झाला. कोहली अपयशी ठरल्यानंतर त्याला पुन्हा एकदा सोशल माध्यमांवर ट्रोल करण्यात आले. ‘विराट कोहलीचा जबरदस्त फॉर्म केवळ एका सामन्यासाठी होता, त्याचा खरा फॉर्म हाच आहे’, नक्की कोणत्या प्रकारचा सूर तुला गवसला आहे अशा आशयाचे ट्विट्स करत त्याला ट्रोल करण्यात आले.
पण त्याआधी, विराट कोहलीने आशिया चषकात चांगली कामगिरी केली होती. भारतीय संघाला अंतिम ४ मध्ये स्थान मिळण्यामागे विराट कोहलीच्या धावांचे योगदान होते. भारताने आपला शेवटचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळला तेव्हा विराट कोहलीने नाबाद १२२ धावा केल्या होत्या. विराट कोहलीचे हे टी२० मधील पहिले शतक होते. तसेच आशिया चषकातील तो सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला होता.
तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने ४ गड्यांच्या अंतराने जिंकला. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २०८ धावा उभ्या केल्या होत्या, परंतु तरीदेखील ऑस्ट्रेलियाने शेवटच्या षटकात बाजी मारली. उभय संघातील या मालिकेत ऑस्ट्रेलिया आता ०-१ अशा आघाडीवर आहे.