IND vs AUS 4th Test Day 2 Highlights in Marathi: मेलबर्न कसोटीमध्ये भारतीय संघ दिवसाअखेर पुन्हा एकदा बॅकफूटवर गेला आहे. विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांनी संघाचा डाव उचलून धरला आणि १०० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली पण पुढच्याच चेंडूवर यशस्वी जैस्वालने धावबाद होत ऑस्ट्रेलियाला विकेट गिफ्ट दिली. यानंतर विराट कोहलीही गडबडला आणि तोही झेलबाद झाला. यानंतर विराट कोहली पॅव्हेलियनमध्ये परतताना चाहत्यांशी भिडताना दिसला, ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
विराट कोहली पुन्हा एकदा वादात सापडला आहे. मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात बाद झाल्यानंतर विराट कोहलीने चाहत्यांशी हुज्जत घातली. मेलबर्नच्या मैदानावरील एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये विराट कोहलीची चाहते हुर्यो उडवत होते यादरम्यान त्याला एखादा चाहता काहीतरी म्हणाला आणि यावर विराटने रागात एक लूक दिला आणि ऑस्ट्रेलियन चाहत्यांना आक्रमकपणे बोलताना दिसत आहे.
हेही वाचा – IND vs AUS: भारताला मेलबर्न कसोटीत फॉलोऑन टाळण्यासाठी किती धावांची आवश्यकता? जाणून घ्या
विराट कोहली आऊट झाल्यानंतर मैदानातून बाहेर पडत असताना ऑस्ट्रेलियन खेळाडू त्याची हुर्याे उडवत होते. विराट कोहली पॅव्हेलियनमध्ये जाऊ लागताच चाहत्यांनी त्याला असे काही बोलले ज्यामुळे विराट संतापला आणि आतमध्ये गेलेला विराट पुन्हा माघारी येऊन चाहत्यांकडे रागात पाहताना दिसला आणि काहीतरी बोलला. दुसऱ्याच क्षणी तिथे उपस्थित सुरक्षा रक्षकाने हस्तक्षेप करत विराटला आत नेले.
मेलबर्न कसोटीच्या सुरुवातीपासूनच विराट कोहली वादात सापडला आहे. पहिल्या दिवशी विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन सलामीवीर सॅम कोन्स्टस यांच्यात धक्काबुक्की झाली होती. यानंतर विराट कोहलीच्या मॅच फी च्या २० टक्के दंड आकारला आणि त्याच्या खात्यात एक डिमेरिट गुणही जोडला आहे. यानंतर जेव्हा ऑस्ट्रेलियन चाहते फिल्डिंग करताना त्यांची हुर्याे उडवत होते तेव्हाही विराटने त्यांना आपल्या अॅक्शनमधून उत्तर दिले. तर आता विराट कोहलीने आऊट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन चाहत्यांशी वाद घातला आहे.
भारतीय संघाने मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ५ बाद १६५ धावा केल्या आहेत. मैदानावर ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजाची जोडी आहे. तर ऑस्ट्रेलियाकडे अजून ३१० धावांची मोठी आघाडी आहे. भारताचा पहिला प्रयत्न फॉलोऑन टाळण्यावर असेल.