Virat Kohli Fined by ICC: मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीपेक्षाही विराट कोहली आणि सॅम कोन्स्टास यांच्यातील वादाने सर्वांचं लक्ष वेधलं. विराट कोहली युवा ऑस्ट्रेलियन फलंदाज सॅम कॉन्स्टासबरोबर भिडताना दिसला. विराट कोहलीवर आता या त्याच्या वागणुकीबद्दल कारवाई करण्यात आली आहे.
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, आयसीसीने विराटला त्याच्या मॅच फीच्या २०% दंड ठोठावला आहे. रिपोर्ट्सनुसार, विराट कोहली लेव्हल १ गुन्ह्याअंतर्गत दोषी आढळला आहे. ही दिलासा देणारी बाब आहे की विराट कोहलीला फक्त एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे, त्यानुसार त्याला पुढील सामन्यात निलंबित केले गेले नाही.
कोहली आणि कॉन्स्टसमध्ये नेमकं काय घडलं?
ऑस्ट्रेलियन डावाच्या १०व्या आणि ११व्या षटकांच्या ब्रेक दरम्यान, जेव्हा कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजा स्ट्राईक बदलत होते, तेव्हा कोहलीही जागा बदलत होता आणि यादरम्यान चालता चालता कॉन्स्टास आणि विराट एकमेकांना धडकले. त्यावेळी समालोचन करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगनेही कोहलीने हे जाणूनबुजून केले, असे मत व्यक्त केले.
विराट कोहली आणि कोन्स्टास यांच्यात वाद झाल्यानंतर कोन्स्टासने अप्रतिम खेळी खेळली. या १९ वर्षीय खेळाडूचा हा पहिला कसोटी सामना आहे आणि त्याने पहिल्या डावातच आपली छाप पाडली. या खेळाडूने बुमराहविरुद्ध दोन षटकार लगावले. कॉन्स्टासने ६५ चेंडूत ६० धावांची खेळी खेळली. या संपूर्ण मालिकेत ऑस्ट्रेलियन टॉप ऑर्डरने खूप निराश केले होते, परंतु कॉन्स्टासने या सामन्यात चांगला फलंदाजी करत संघाला महत्त्वपूर्ण सुरूवात करून दिली. उस्मान ख्वाजा आणि कोन्स्टासने पहिल्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी केली.