भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे, परंतु असे असूनही, त्याचे फॅन फॉलोइंग जगभरात कोणत्याही प्रकारे कमी झालेले नाही. शुक्रवारी विराटने इन्स्टाग्रामवर १५० मिलियन फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे. या टप्प्यावर पोहोचणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
१५० मिलियन इंस्टाग्राम फॉलोअर्स मिळवणारा विराट कोहली क्रिकेट जगताचा पहिला क्रिकेटपटू आहे. केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण आशियामध्ये इतके फॉलोअर्स असलेला तो पहिला व्यक्ती आहे. जर आपण क्रीडा विश्वाबद्दल बोललो, तर तो या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्सच्या बाबतीत क्रीडाविश्वात प्रथम येतो. त्याचे ३३७ मिलियन फॉलोअर्स आहेत. २६० मिलियन फॉलोअर्ससह लिओनेल मेस्सी या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमारचे इंस्टाग्रामवर १६० मिलियन फॉलोअर्स आहेत. यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीचा नंबर येतो.
हेही वाचा – ENG vs IND : मोहम्मद शमीसाठी केलेलं ‘ते’ ट्वीट ऋषभ पंतच्या आलं अंगाशी; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
हॉपर एचक्युनुसार, विराट कोहलीला इन्स्टाग्रामवर मोठ्या संख्येने फॉलोअर्स असल्याचा फायदा मिळतो. इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकण्यासाठी तो पाच कोटींपर्यंत शुल्क आकारतो. रोनाल्डोला स्पॉन्सर पोस्टसाठी ११.७२ कोटी रुपये मिळतात. त्याचप्रमाणे, मेस्सीला ८.५४ कोटी आणि नेमारला सहा कोटी प्रत्येक स्पॉन्सर पोस्टसाठी मिळतात.