सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे गुरुवारी (१९ जानेवारी) पॅरिस सेंट जर्मेन (PSG) आणि रियाध इलेव्हन यांच्यात एक प्रदर्शनीय सामना खेळला गेला. या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोने पुन्हा एकदा आपल्या खेळाने चाहत्यांची मने जिंकली. रियाध इलेव्हनचा कर्णधार असलेल्या क्रिस्टियानो रोनाल्डोने दोन सुंदर गोल केले.
कोहलीने रोनाल्डोच्या खेळाचे कौतुक केले –
मात्र, रोनाल्डोच्या या दमदार कामगिरीनंतरही रियाध इलेव्हनला पीएसजीविरुद्ध ४-५ अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. पीएसजीच्या संघात लिओनेल मेस्सी, कायलियन एमबाप्पे आणि नेमार ज्युनियरसारखे खेळाडू होते. आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने ख्रिस्तियानो रोनाल्डोचे तोंडभरून कौतुक केले आहे. कोहलीने रोनाल्डोच्या टीकाकारांनाही फटकारले आहे.
हेही वाचा – ‘जर एक मालिका गमावली म्हणून हटवले, तर….’, कपिल यांचा बीसीसीआयच्या निवडकर्त्यांना हार्दिकबद्दल कडक इशारा
तो अजूनही ३८ वर्षाचा असून सर्वोच्च स्तरावर – विराट कोहली
कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, ”तो अजूनही ३८ वर्षाचा असून सर्वोच्च स्तरावर आहे. फुटबॉल पंडित त्याच्यावर दर आठवड्याला बातम्यांमध्ये राहण्यासाठी टीका करतात आणि नंतर अगदी सहज शांत होतात. जगातील अव्वल क्लबपैकी एका संघाविरुद्ध त्याने अशी कामगिरी केली आहे. जेव्हा तो संपला असे लोक सांगत होते.”
या सामन्याद्वारे रोनाल्डो आणि मेस्सी फुटबॉलच्या खेळपट्टीवर शेवटच्या वेळी आमनेसामने आले असावेत. कारण रोनाल्डोने अलीकडेच आशियाई क्लब असलेल्या अल नासेर एफसीशी करार केला आहे. तर लिओनेल मेस्सी पीएसजी या फ्रेंच क्लबकडून खेळतो. फुटबॉलच्या बाबतीत रोनाल्डोचे वयही वाढले आहे, अशा परिस्थितीत तो पुढचा विश्वचषक क्वचितच खेळू शकेल.
दुसऱ्या वनडेत विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा –
विराट कोहलीबद्दल बोलायचे, तर तो सध्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत व्यस्त आहे. भारतीय संघाने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर २१ जानेवारीला होणार आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विराट कोहली जबरदस्त खेळ दाखवत आहे.