गेल्यावर्षी अर्धवट राहिलेली पाच सामन्यांची कसोटी मालिका पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला आहे. तिथे १ जुलै ते ५ जुलै याकाळात दोन्ही संघादरम्यान शेवटचा कसोटी सामना होणार आहे. मुख्य सामन्यापूर्वी लीसेस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबच्या अपटॉनस्टील काउंटी मैदानावर एक सराव सामना होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ जोरदार सराव करत आहे. भारतीय संघाच्या सराव सत्रादरम्यान एक गोंधळात टाकणारे दृश्य बघायला मिळाले. लीसेस्टरशायर क्लबने मंगळवारी भारताच्या सराव सत्रातील एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ बघून विराट कोहली पुन्हा कर्णधारपदाच्या भुमिकेत आला आहे का? याची चर्चा सुरू झाली आहे.
लीसेस्टरशायरच्या मैदानावर भारतीय संघ चार दिवसीय सराव सामना खेळणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांसारख्या दिग्गज खेळाडूंसाठी यजमानपद भूषवणे ही क्लबसाठी फार कौतुकाची गोष्ट आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंच्या प्रत्येक हालचालीवर आणि सराव सत्रावर क्लब लक्ष ठेवून आहे. भारताच्या सराव सत्रादरम्यानचा एक व्हिडिओ क्लबने पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आपल्या सहकाऱ्यांना एक जोशपूर्ण भाषण देताना दिसत आहे. ज्याप्रमाणे एखादा कर्णधार आपल्या संघाचे मनोधैर्य वाढवतो अगदी त्याचप्रमाणे कोहली बोलताना दिसत आहे.
कोहलीच्या भाषण देण्यामागे एक खास कारण आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू झाली होती. तेव्हा विराट कोहली संघाचा कर्णधार होता. मात्र, ओल्ड ट्रॅफर्ड येथील पाचवा कसोटी सामना करोनाच्या उद्रेकामुळे खेळता आला नाही. भारतीय संघ आपला इंग्लंड दौरा अर्धवट सोडून परत आला होता. आता पुन्हा भारतीय संघ अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी गेला आहे तर आपली नैतिक जबाबदारी म्हणून विराट कोहलीने खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा – Video : डेव्हिड वॉर्नरचा ओळखा पाहू कोण ‘लूक’ बघितला का?
मालिका पुढे ढकलण्यात आल्यापासून दोन्ही संघांमध्ये बरेच बदल झाले आहेत. विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर रोहित शर्माने भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारले. दरम्यान, इंग्लंडनेही जो रूटच्या जागी अष्टपैलू बेन स्टोक्सकडे इंग्लंडचे कर्णधारपद दिले आहे. याशिवाय दोन्ही संघांचे मुख्य प्रशिक्षकदेखील बदलले आहेत. भारतीय संघ राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहे तर यजमानांचा संघ ब्रँडन मॅकक्युलमच्या मार्गदर्शनाखाली.