भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. तिथे भारताला एक कसोटी सामना खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ लिसेस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबविरुद्ध चार दिवसीय सराव सामना खेळत आहे. सर्व खेळाडूंचा सराव व्हावा यासाठी भारतीय संघातील चार चार खेळाडू लिसेस्टरशायर संघाकडून खेळत आहेत. यामध्ये प्रसिद्ध कृष्णाचाही समावेश आहे. कृष्णाने या सामन्यात भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरला शून्यावर बाद केले. गंमत म्हणजे बळी मिळण्यापूर्वीच विराट कोहलीने प्रसिद्ध कृष्णाला काही टिप्स दिल्या होत्या.

आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सने याबाबत ट्विट केले आहे. प्रसिद्ध कृष्णा राजस्थानच्या संघाचा भाग आहे. राजस्थान रॉयल्सने ट्विट केले की, “प्रसिद्ध, लिसेस्टरशायरकडून खेळत आहे. सराव सामन्यात विराट कोहलीने त्याला टिप्स दिल्या आणि पुढच्याच चेंडूवर त्याने श्रेयस अय्यरला बाद केले.”

भारताचा डाव सुरू असताना १९व्या षटकाच्या अखेरीस कोहलीने कृष्णाशी संवाद साधला. यानंतर हा तो गोलंदाजीसाठी आला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर अय्यरला बाद केले. चेंडू ऑफ-स्टंपच्या बाहेर गेला होता. अय्यरने कव्हरमध्ये चेंडू टोलावण्याचा प्रयत्न केला, परंतु तो थेट लिसेस्टरशायरकडून खेळणाऱ्या यष्टिरक्षक ऋषभ पंतकडे गेला. परिणामी ११ चेंडूंचा सामना केलेला अय्यर शून्यावर बाद झाला.

ऋषभ पंत आणि प्रसिद्ध कृष्णाशिवाय चेतेश्वर पुजारा आणि जसप्रीत बुमराह हे देखील लिसेस्टरशायर संघाकडून खेळत आहेत. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या सर्व खेळाडूंना सराव मिळावा यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि इंग्लंड क्रिकेट मंडळाच्या संमतीने हा बदल करण्यात आला आहे.