Virat Kohli Gift to Delhi Players while Ranji Trophy: भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली १२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी उतरला होता. विराटला रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. याशिवाय त्याला सराव करताना पाहण्यासाठी देखील अरूण जेटली स्टेडियमबाहेर चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली. विराट कोहलीने रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन केले पण तो फलंदाजीत फ्लॉप ठरला. मात्र त्याने चाहत्यांची मनं मात्र जिंकली.
रणजी सामन्यादरम्यान कोहली दिल्लीच्या रणजी संघातील खेळाडूंसह सराव करताना आपल्या नेहमीच्या अंदाजात दिसला. मैदानावर छान मजा मस्ती करत आणि तितकाच जबरदस्त फलंदाजीचा सरावदेखील केला. त्याने चाहत्यांचे आणि सहकारी खेळाडूंचे भरपूर मनोरंजन केले. सामन्यादरम्यान विराटला भेटण्यासाठी तीन वेळा चाहते मैदानात घुसले.
कोहलीने रणजी सामन्यानंतर परत जाताना दिल्ली संघातील खेळाडूंना अनेक भेटवस्तू देतात. रणजी ट्रॉफी सामन्यात विराट कोहली आपल्या बॅटने मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. पण आता त्याने सनत सांगवानला त्याची बॅट भेट म्हणून दिली आहे. यासाठी चाहत्यांनी विराटचे खूप कौतुक केले आहे.
सनतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत जे रणजी सामन्यातील आहेत. पहिल्या फोटोमध्ये सनत आणि विराट एकत्र दिसत आहेत. विराट सनतला त्याची बॅट भेट देताना दिसत आहे. त्याने सामन्यादरम्यानचे मैदानावरील काही फोटो शेअर केले आहेत. याशिवाय विराट आणि तो मैदानावर फलंदाजी करतानाचा फोटोही आहे. सनतच्या जर्सीवर विराट कोहलीचा ऑटोग्राफही आहे. तर बॅटवरही सनतसाठी विराटने शुभेच्छा देत ऑटोग्राफ दिला आहे.
दैनिक जागरणशी बोलताना सनत सांगवान विराट कोहलीबरोबर मैदानावर खेळतानाचा अनुभव सांगितला. सनत सांगवान हा तोच फलंदाज आहे, ज्याच्याबरोबर विराट कोहली रणजी सामन्यात मैदानावर खेळत होता. सनत सांगवान म्हणाला, “जेव्हा विराट कोहली फलंदाजीसाठी मैदानावर आला तेव्हा त्याने मला विचारलं चेंडू मुव्ह होतोय की नाही आणि त्यानंतर तो म्हणाला, तू चांगली फलंदाजी करत आहेस आणि त्याप्रमाणेच फलंदाजी करत राहा. मोठी भागीदारी रचण्याविषयीही त्याने चर्चा केली.”
पुढे सनत म्हणाला, “याशिवाय विराटने मैदानावर फिल्डिंग करतानाचा अनुभवही सांगितला. विराटने दिल्लीच्या खेळाडूंना अनेक गोष्टी भेट म्हणून दिल्या. त्याने बऱ्याच खेळाडूंना बॅट भेट म्हणून दिली. त्याने त्याची बॅट मला, आयुष बदोनी, सर्वेश बेदी आणि नवदीप सैनीला भेट म्हणून दिली. इतकंच नव्हे तर त्याने मला आणि वैभवला त्याची किट बॅगदेखील भेट म्हणून दिली, ज्यावर VK18 लिहिलेलं आहे.”