Yashasvi Jaiswal And Virat Kohli Practice Session Video Viral : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जूनपासून इंग्लंडच्या ओवल मैदानात खेळवला जाणार आहे. यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचे खेळाडू मैदानात कंबर कसत आहेत. टीम इंडियाच्या सरावादरम्यानचा एक व्हिडीओ आयसीसीने शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून क्रिकेटप्रेमी या व्हिडीओला लाईक्स करत आहेत. आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या यशस्वी जैस्वालची टीम इंडियात निवड करण्यात आली आहे.
त्यामुळे इंग्लंडच्या मैदानात जैस्वाल प्रचंड सराव करत आहे. नेटमध्ये सराव करत असताना विराट कोहली आणि रविचंद्रन आश्विनने जैस्वालला मार्गदर्शन केलं आहे. विराट ज्या अंदाजात जैस्वालला फलंदाजीच्या टीप्स देत आहे, ते एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. जैस्वालने विराटच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली आहे. आयसीसीने या खेळाडूंचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिलंय, “जैस्वालचा इंग्लंडमध्ये पहिला लूक…”
इथे पाहा व्हिडीओ
यशस्वी जैस्वालने आयपीएलच्या या हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. जैस्वालने १४ सामन्यांमध्ये ६२५ धावा कुटल्या आहेत. तसंच त्याने या हंगामात एक शतकही ठोकलं आहे. विशेष म्हणजे जैस्वालने ज्या अंदाजात फलंदाजी केलीय, ते पाहून दिग्गज खेळाडूंनीही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. गावसकर, रवी शास्त्री यांनीही जैस्वालवर स्तुतीसुमने उधळली आहेत. आयपीएलमध्ये जबरदस्त टेक्निकमध्ये फलंदाजी करून अनेक दिग्गज खेळाडूंना आश्चर्याचा धक्का दिला आहे. आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी केल्यामुळं या फायनलमध्ये जैस्वालने त्याची जागा पक्की केली आहे. जैस्वालला सूर्यकुमार यादवच्या जागेवर स्टॅंडबाय खेळाडू म्हणून सामील केलं आहे.