IND vs BAN 2nd Test Scorecard: भारत वि बांगलादेश कानपूर कसोटीत बांगलादेशचा डाव २३३ धावांवर आटोपल्यानंतर भारताने ९ बाद २८५ धावा केल्या आहेत. पावसामुळे दुसरा आणि तिसरा दिवस रद्द झाल्यानंतर चौथ्या दिवशीचा खेळ पावसाच्या व्यत्ययाविना खेळवण्यात आला. भारतीय संघाकडून फंलदाजीत आक्रमक सुरुवात पाहायला मिळाली, ज्यात कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी अवघ्या ३ षटकांत ५० धावा करत विक्रम रचला. खेळाच्या चौथ्या दिवशी विराट कोहली ऋषभ पंतबरोबर फलंदाजी करत असताना धावबाद होण्यापासून थोडक्यात बचावला. यादरम्यान कोहली रागावलेला होता आणि तसा कटाक्षही त्याने पंतकडे टाकला. पण यानंतर पंतने जे केलं ते पाहून सर्वच जण हसू लागले.
रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांच्या आक्रमक खेळीनंतर संघ व्यवस्थापनाने कानपूर कसोटी सामन्यातील पहिल्या डावात विराट कोहलीच्या आधी ऋषभ पंतला फलंदाजीसाठी पाठवले. गिलची विकेट पडल्यानंतर विराट कोहली फलंदाजीसाठी मैदानात आला, ज्यामध्ये त्याने पंतसह धावांचा वेग कायम ठेवण्याचे काम केले. दरम्यान, भारतीय संघाच्या डावाच्या १९व्या षटकात बांगलादेशकडून खालिद अहमद ज्या षटकात गोलंदाजी करत होता, त्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर विराटने समोरच्या दिशेने एक फटका खेळून धावा चोरण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू खेळपट्टीवरच राहिला. कोहली धाव घेण्यासाठी वेगाने धावला पण पंतने नकार दिला.
विराट कोहली ऋषभ पंतवर मैदानातच भडकला
धाव घेण्यासाठी गेलेला विराट कोहली जवळपास अर्ध्या खेळपट्टीवर पोहोचला होता आणि खालिद अहमदने पुढे धावत जाऊन चेंडू पकडला आणि विकेटच्या दिशेने धावत फेकण्याचा प्रयत्न केला पण तो चेंडू विकेटवर मारू शकला नाही आणि कोहली सहज धावबाद होण्यापासून बचावला. विराट धावबाद होणार हे त्याला कळलं आणि तो तिथेच उभा राहिला पण खालिदच्या चुकीमुळे चेंडू विकेटच्या बाजूने गेला.
विराट कोहली यानंतर क्रीझवर धावत गेला. तिथे पोहोचताच विराटने ऋषभ पंतकडे रागाने पाहिले, ज्यामध्ये पंत माफी मागताना दिसला आणि नंतर त्याने जाऊन विराट कोहलीला मिठी मारली. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा – IND vs BAN: रोहित शर्माचा हवेत झेपावत एकहाती झेल; गिलने धरलं डोकं तर कोच झाले चकित, पाहा VIDEO
कानपूर कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या पहिल्या डावात विराट कोहलीने ३५ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारासह ४७ धावांची खेळी केली. या खेळीसह कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७ हजार धावा पूर्ण करण्यात यश मिळवले. विराटने कमी डावात २७ हजार धावा पूर्ण करत सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.