Virat Kohli Statement on Test Future: चॅम्पियन्स ट्रॉफी विजयानंतर रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या भविष्याबाबत आणि निवृत्तीनंतर मोठी चर्चा होती. रोहित शर्माने कसोटी आणि वनडेमधूनही निवृत्ती घेणार नसल्याचे स्पष्ट सांगितले. पण विराट कोहलीने या अफवांबाबत कोणतेच वक्तव्य दिले नाही. पण दरम्यान विराट कोहलीने आयपीएल २०२५ सुरू होण्यापूर्वीच त्याच्या कसोटीमधील भविष्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. विराटच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.
विराट कोहलीसाठीही चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीचा ऑस्ट्रेलिया दौरा फार खास नव्हता. विराट कोहलीने पहिल्याच सामन्यात शतक झळकावले पण यानंतर मोठी धावसंख्या रचू शकला नाही. विराट आणि रोहितच्या खराब कामगिरीचा संघाला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी दौऱ्यावर मोठा फटका बसलेला पाहायला मिळाली. भारताने दशकभरानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावली होती. यानंतर बीसीसीआयने नवे नियमही जाहीर केले होते.
विराट कोहली शनिवारी १५ मार्चला आयपीएलच्या १८व्या हंगामासाठी त्याच्या फ्रेंचायझी बेंगळुरूमध्ये सामील झाला. यावेळी फ्रँचायझीच्या एका कार्यक्रमात कोहलीने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्याच्या अलीकडच्या फॉर्मबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोनशेहून अधिक धावा करणारा विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपयशी ठरला होता. त्याच्या बॅटमधून फक्त एकच शतक पाहायला मिळाले. पण यापूर्वी कसोटीमध्ये विराटचा ऑस्ट्रेलियामधील रेकॉर्ड कमालीचा आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ या संपूर्ण दौऱ्यात कोहली ऑफ-स्टंपबाहेरील चेंडूंवर वारंवार आऊट होत राहिला, ज्यामुळे केवळ चाहतेच नाही तर तज्ज्ञांनाही आश्चर्य वाटले. त्यामुळे कोहलीला त्या दौऱ्यावर फलंदाजी करताना त्याच्या संघर्षाबद्दल विचारले असता, विराट कोहली म्हणाला, “मी कदाचित पुन्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळू शकणार नाही, त्यामुळे यापूर्वी जे घडलं जी कामगिरी मी करू शकलो, त्यात समाधानी आहे.” टीम इंडियाचा पुढील ऑस्ट्रेलिया दौरा २०२७ च्या अखेरीस होणार आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील अपयशानंतर कोहलीच्या कसोटी कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आयपीएलनंतर इंग्लंड दौऱ्यावर त्याची संघात निवड होईल का? निवड झाल्यास या मालिकेनंतरच निवृत्ती घेणार का? अशा वेगवेगळ्या चर्चा पूर्वीपासूनच सुरू होत्या, पण विराटच्या वक्तव्यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे.