टीम इंडियाच्या पाठीमागे लागलेलं दुखापतीचं ग्रहण काहीकेल्या संपत नाहीये. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने आक्रमक खेळ केला. त्याचं शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं. मात्र या खेळीदरम्यान त्याच्या बरगड्यांना दुखापत झाल्यामुळे तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरु शकला नाही. त्यातच क्षेत्ररक्षणादरम्यान भारतीय संघाचा दुसरा सलामीवीर आणि उप-कर्णधार रोहित शर्माच्या खांद्याला दुखापत झाली. या दुखापतीनंतर रोहितने तात्काळ मैदान सोडलं.

रोहित दुसऱ्या सामन्यात ज्या पद्धतीने मैदानाबाहेर गेला ते पाहून तो अंतिम सामन्यात खेळणार की नाही हा प्रश्न चाहत्यांना मनात सतावत होता. मात्र भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने रोहितच्या दुखापतीबद्दल महत्वाची माहिती दिली आहे. “मी रोहितला त्याच्या दुखापतीबद्दल विचारलं आहे. याआधीही त्याला अशाप्रकारे डाव्या खांद्याचा त्रास जाणवला आहे. मात्र सुदैवाने चिंता करण्याचं कोणतही कारण नाहीये, त्यामुळे पुढच्या सामन्यापर्यंत तो फिट असेल अशी आशा आहे.”

दरम्यान पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्माने, दुसऱ्या वन-डे सामन्यात ४२ धावांची खेळी केली. आपलं अर्धशतक पूर्ण करण्यात त्याला अपयश आलं असलं तरीही शिखर धवनसोबत पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी करत रोहितने संघाला भक्कम सुरुवात करुन दिली. या मालिकेतला अखेरचा सामना रविवारी बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर होणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ बाजी मारुन मालिकेवर कब्जा मिळवतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs Aus : सलामीवीर रोहित शर्माचा विक्रम, हाशिम आमलाला टाकलं मागे

Story img Loader